कातुर्डीत तमाशाच्या जागी आता नमनाचा जागर
तमाशाच्या जागी आता नमनाचा जागर
शिमगोत्सवातील परंपरा ; कातुर्डीत कला, चालीरीतींचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ७ : कोकणचा शिमगोत्सव म्हटला की, प्रत्येक गावात परंपरेने चालत आलेल्या वैविध्यपूर्ण रूढी, कला आणि चालीरीतींचे दर्शन घडते. गोमूचा नाच, शंकासुर, खेळे, नमन आणि ढोल-ताशांच्या गजरात भक्तीमय वातावरणात हा उत्सव साजरा होतो. शृंगारपूर जवळील कातुर्डी गावातही अशीच एक अनोखी परंपरा असून, बदलत्या काळानुसार तरुणांनी या पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देत ती जिवंत ठेवली आहे.
कातुर्डी गावात पूर्वापार परंपरेनुसार होमाच्या दिवशी (धुळीवंदन) रात्री तमाशा सादर करण्याची प्रथा आहे. यावेळी देवी वाघजाईच्या नावाने एका तरुणाला साडी नेसवून, वाद्यावर ‘थाप’ मारून खेळाची सुरुवात केली जाते. पूर्वी याला ‘तमाशाचा फड’ असे संबोधले जाई. गावातील कलाकार हा फड घेऊन केवळ कातुर्डीतच नव्हे, तर नेरद, पाचांबा, कुचांबे या शेजारील गावांमध्येही वाघजाई देवीच्या रूपात भेटी देत असत.
कालांतराने नोकरी-व्यवसायानिमित्त कातुर्डीतील तरुण वर्ग मुंबई-पुण्यासारख्या शहरांकडे स्थलांतरित झाला. त्यामुळे गावातील वृद्ध मंडळींना इतर गावांमध्ये जाऊन खेळ सादर करणे कठीण झाले. ही पारंपरिक कला नामशेष होते की काय, अशी भीती व्यक्त केली जात असतानाच गावातील तरुण वर्ग एकवटला. त्यांनी जुन्या परंपरेला ‘नमन’ कलेची जोड दिली. आता तमाशाच्या जागी ‘नमन’ सादर केले जाते. वर्षातून केवळ एकदाच होमाच्या दिवशी वाघजाई देवीच्या नावाने सादर होणारा हा ‘खेळ’ वारसाहक्काने तरुण पिढी जोपासत आहे. आपल्या गावची संस्कृती आणि श्रद्धा जपणाऱ्या या तरुणांच्या उत्साहाबद्दल गावातील जुन्या-जाणत्या मंडळींनी समाधान व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

