रत्नागिरी - रत्नागिरी पोलीस दलाचा ''विराट'' आधार हरपला
- rat7p17.JPG
29268
रत्नागिरी ः विराट श्वानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करताना पोलिस दल.
पोलिस दलाचा ‘विराट’ आधार हरपला
डॉबरमन जातीचा श्वान; शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : रत्नागिरी पोलिसांचा अत्यंत विश्वासू, धाडसी आणि कर्तबगार सहकारी ‘विराट’ या पोलिस श्वानाचे गुरुवारी (ता. ६) आकस्मिक निधन झाले. एका निष्ठावान सहकाऱ्याच्या जाण्याने संपूर्ण रत्नागिरी पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या उपस्थितीत विराटवर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉबरमन जातीचा असलेला विराट २०१७ मध्ये रत्नागिरी पोलिस दलात दाखल झाला होता. गेल्या ९ वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्याने अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा लावण्यात मोलाची भूमिका बजावली होती. गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी चपळाई आणि वासावरून माग काढण्यात त्याचा हातखंडा होता.
विराटच्या निधनामुळे पोलिस दलाने आपला एक ‘सच्चा साथीदार’ गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. रत्नागिरी येथील ‘बॉम्ब शोध व नाशक पथक’ कार्यालयाच्या आवारात त्याला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी पोलिसांच्या तुकडीने हवेत गोळीबार करून त्याला सलामी दिली.
याप्रसंगी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव, राजेंद्र कुळसंगे, पोलिस उपनिरीक्षक शेगाबेन मावची, किरण घाग आणि पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या या लाडक्या सहकाऱ्याला अखेरचा निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते.
------
चौकट
गुन्हेगारांना पकडण्यात मदत
विराटच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे पोलिसांना शक्य झाले. त्याच्या कार्यकाळात त्याच्या मदतीने २ खुनाचे गुन्हे उघडकीस आणले होते. तसेच १ अपहरणाचा गुन्हा, १० चोरीच्या गुन्ह्यांत पोलिसांना ठोस पुरावे मिळवून देण्यात विराटने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

