चिंदर सडेवाडीत पर्यावरणाप्रती कृतज्ञता

चिंदर सडेवाडीत पर्यावरणाप्रती कृतज्ञता

Published on

29475

चिंदर सडेवाडीत पर्यावरणाप्रती कृतज्ञता

‘ईको-फ्रेंडली होळी’; शिमगोत्सवात झाडाऐवजी फांदीचे पूजन

​सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ८ ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो; मात्र, अलिकडच्या काळात वृक्षतोडीचे वाढते प्रमाण लक्षात घेता, मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी येथील ग्रामस्थांनी पर्यावरणाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक आदर्श पायंडा घालून दिला आहे. सडेवाडीतील गोसावीवाडी, हडकरवाडी, देवकोंडवाडी आणि गोलाकरवाडी या चारही वाड्यांच्यावतीने सलग दुसऱ्या वर्षी पूर्ण झाड तोडण्याऐवजी केवळ झाडाची ‘फांदी’ वापरून होळी साजरी केली.
​सिद्धमहापुरुष मठात रंगला पर्यावरणपूरक उत्सव ​चिंदर-सडेवाडी येथील ग्रामदैवत सिद्धमहापुरुष मठ, गोसावीवाडी येथे हा उत्सव परंपरेनुसार पार पडला. कोकणात अनेक ठिकाणी होळीसाठी मोठे आंबा किंवा माडाचे झाड तोडले जाते; मात्र निसर्ग वाचला तरच आपण वाचू, हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत हा निर्णय घेतला. संपूर्ण आंब्याचे झाड न तोडता केवळ एका फांदीचे पूजन करून होळीची परंपरा जपली गेली. गोसावीवाडी, हडकरवाडी, देवकोंडवाडी व गोलाकरवाडी या चारही वाड्यांतील ग्रामस्थांचा यामध्ये सक्रिय सहभाग होता. पूर्वजांपासून चालत आलेल्या धार्मिक विधींना धक्का न लावता पर्यावरणाची हानी टाळणारा हा बदल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
​होळीचा सण हा आनंदाचा आणि मांगल्याचा आहे. निसर्गाचा ऱ्हास करून उत्सव साजरा करण्यापेक्षा, निसर्गाचे रक्षण करत परंपरा जपणे अधिक महत्त्वाचे आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही राबवत असलेला हा उपक्रम पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी चिंदरवासीयांनी व्यक्त केला. चिंदरमधील या ‘ईको-फ्रेंडली’ होळीचे सर्वत्र कौतुक होत असून, इतर गावांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com