रत्नागिरी - संगमेश्वरचे सभापतीपदी पहिल्या टप्प्यात शिवसेनेकडे
संगमेश्वरचे सभापतीपदी पहिल्या टप्प्यात शिवसेनेकडे
आज निवड ; उपसभापती पद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ८ ः संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक उद्या (ता. ९) पार पडणार आहे. यंदा निवडणुकीत महायुतीने वर्चस्व मिळवले असून, सत्तेच्या सारीपाटात पदांचे वाटपही निश्चित झाले आहे. पहिल्या टप्प्यात सभापती पद शिवसेने कडे (शिंदे गट) तर उपसभापती पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
संगमेश्वर पंचायत समितीच्या एकूण जागांचा आणि पक्षीय बलाबल पाहता महायुतीची पकड मजबूत दिसून येते. यामध्ये शिवसेना (शिंदे गट) ४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४ आणि भाजप २ अशा एकूण १० सदस्यांचे पाठबळ महायुतीकडे आहे. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडे ४ सदस्य असून त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागणार असल्याचे सध्यातरी चित्र आहे.
महायुतीच्या नेत्यांमध्ये झालेल्या निर्णयानुसार, पहिल्या अडीच वर्षांच्या किंवा ठराविक टप्प्याच्या कालावधीसाठी सभापती पद शिंदे गटाला देण्याचे ठरले आहे. या पदासाठी परचुरी गणातून निवडून आलेल्या शर्वरी वेल्ये यांचे नाव आघाडीवर असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. तसेच, उपसभापती पद राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) बहाल करण्यात येणार आहे. या पदासाठी किरडुवे गणाचे प्रतिनिधीत्व करणारे प्रफुल बाईत यांचे नाव निश्चित मानले जात आहे. या दोन्ही नावांची अधिकृत घोषणा सोमवारी निवडणुकीच्या प्रक्रियेनंतर केली जाईल.
सोमवारी होणाऱ्या या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. महायुतीने आपले वर्चस्व राखण्यासाठी सर्व सदस्यांची तटबंदी मजबूत केली असून, फुटीची कोणतीही शक्यता उरलेली नाही. शिंदे गट, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील या समन्वयामुळे संगमेश्वरच्या राजकारणात महायुतीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे. उद्याच्या विशेष सभेत पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडेल, त्यानंतर नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींचा विजयोत्सव साजरा केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

