विधवेच्या ओटीत सौभाग्याचे दान
29619
विधवेच्या ओटीत सौभाग्याचे दान
करूळ ग्रामपंचायतीचा आदर्श; महिला दिनी समतेचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ८ ः पतीच्या निधनामुळे पत्नीचे उतरवलेले सौभाग्य जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘तिला’ पुन्हा परिधान करू दिले. करुळ ग्रामपंचायतीने परिवर्तनाचा संदेश देत महिला ग्रामसभेत गावातील शरयू दीपक जामदार यांना सौभाग्यासह सामाजिक भान मिळवून दिला. या उपक्रमामुळे ग्रामसभेत काहीसे भावनिक वातावरण निर्माण झाले. सरपंच नरेंद्र कोलते यांनी धाडसी निर्णय घेत उचललेल्या सकारात्मक पावलाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.
हिंदू संस्कृतीनुसार पतीच्या निधनानंतर घरातून अंत्ययात्रा निघण्यापूर्वी ‘त्या’ पत्नीचे सौभाग्य उतरविण्याची प्रथा समाजात अनेक ठिकाणी आहे; मात्र करुळ ग्रामपंचायतीने या रुढीला छेद देण्याचा निर्णय घेऊन अन्य महिलांप्रमाणे विधवांनाही सन्मान मिळवून दिला आहे. पतीच्या निधनानंतर प्रथेनुसार शरयू जामदार यांचे सर्व अलंकार उतरवले होते; मात्र जागतिक महिला दिनी झालेल्या महिला ग्रामसभेत त्यांचे अलंकार उपस्थित महिलांनी शरयू यांच्या अंगावर चढवून त्यांना सौभाग्याचे दान दिले. यावेळी उपस्थित महिलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. हळदीकुंकू कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी शरयू जामदार यांना वाण देत सन्मान केला. यावेळी जामदार यांच्या सातवी व पाचवीत शिकणाऱ्या दोन्ही मुली उपस्थित होत्या.
या हळदीकुंकू कार्यक्रमात सहभागी व्हायला मिळाल्याचा आनंद त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. यावेळी सरपंच कोलते व पंचायत समितीचे अधिकारी संतोष टक्के यांच्यावतीने शरयू यांना स्वावलंबी होण्यासाठी शिलाई मशीन भेट दिली. तसेच ग्रामपंचायतीच्यावतीने साडी भेट दिली. महिला दिनानिमित्त घेतलेल्या या निर्णयामुळे करुळ ग्रामपंचायतीने महिलांच्या सन्मानाचा आणि सामाजिक समतेचा आदर्श घालून दिला आहे. गावातील ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. समाजातील जुन्या रुढींना बदलण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. पंचायत समिती सदस्या साची कोलते, निशिगंधा माळकर व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सरपंच कोलते, साची कोलते, ग्रामविकास अधिकारी शशिकांत गुरव, सिंधुताई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. उपसरपंच भास्कर सावंत, ग्रामपंचायत सदस्य सचिन कोलते, रेखा सरफरे, दीपाली जामदार, रोहिणी लाड, निशिगंधा माळकर, शशिकांत गुरव उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

