‘धारगळ आयुष’चा विस्तार होणार
29692
‘धारगळ आयुष’चा विस्तार होणार
प्रमोद सावंत : आणखी ५० एकर जागा देणार
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता ९ : गोव्यातील धारगळ येथे केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचा विस्तार करण्यासाठी गोवा सरकार आणखी ५० एकर जमीन उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा यांच्या वतीने रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी आणि विशेष आयुर्वेदिक उपचार सेवांच्या विस्तारासाठी विविध आरोग्य सुविधा व उपचार केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आयुष मंत्रालयाचे सचिव व्ही. राजेश कोटेचा, संस्थेचे संचालक प्रा. पी. के. प्रजापती, आयुष महाविद्यालयाच्या अधिष्ठाता प्रा. डॉ. सुजाता कदम उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, ‘‘नव्याने सुरू झालेल्या आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्यासाठी आणि रुग्णांना प्रगत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या महाविद्यालयातील १०० पदवीपूर्व जागांपैकी ५० टक्के जागा गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या आहेत. आधुनिक आरोग्यसेवेसोबतच पारंपरिक औषध प्रणालींना प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकार कटिबद्ध आहे. संस्थेच्या विस्ताराची गरज लक्षात घेऊन कर्करोग संशोधन केंद्र, केंद्रीय संशोधन प्रयोगशाळा, फार्मसी आणि इतर प्रगत सुविधा उभारण्यासाठी अतिरिक्त ५० एकर जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे.’’ अधिष्ठाता डॉ. कदम यांनी, नवीन सुविधांमुळे क्लिनिकल प्रशिक्षण आणि संशोधनाला गती मिळेल. यामध्ये बालकांसाठी विशेष पंचकर्म उपचार, हाडांच्या आरोग्याचे मूल्यांकन आणि ऑस्टिओपोरोसिसचे लवकर निदान, अत्याधुनिक यंत्रणेद्वारे उपचार आणि पुनर्वसन सेवा, आयुर्वेदाची तत्त्वे आणि आधुनिक निदान पद्धती यांचा समन्वय साधून समाजाला उच्च दर्जाची आरोग्यसेवा देणे, हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे सांगितले.
----
देशभर आयुर्वेदाच्या पायाभूत सुविधा
केंद्रीय आयुष राज्यमंत्री जाधव म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आयुष मंत्रालय देशभर आयुर्वेदाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी कार्यरत आहे. धारगळ येथील नव्या सुविधांमुळे एकात्मिक उपचार पद्धतीचा लाभ रुग्णांना मिळेल.’’ व्ही. राजेश कोटेचा यांनी, ‘‘जागतिक स्तरावर आयुर्वेदाला मिळत असलेली मान्यता पाहता, धारगळ येथील महाविद्यालय संशोधन आणि रुग्णसेवेत महत्त्वाची भूमिका बजावेल,’’ असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

