मळगावात ‘कळसवणी’ सोहळा दिमाखात
29693
मळगावात ‘कळसवणी’ सोहळा दिमाखात
सांस्कृतिक वारशाचे प्रतीक; शिमगोत्सवातील आगळी प्रथा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ : तळकोकणातील शिमगोत्सव म्हणजे केवळ सण नव्हे, तर परंपरा, श्रद्धा आणि गावकुसातील एकोप्याचे जिवंत दर्शन घडवणारा उत्सव आहे. प्रत्येक गावाची एक वेगळी ओळख आणि काही खास परंपरा असतात. तालुक्यातील मळगाव हे देखील अशाच वैशिष्ट्यपूर्ण परंपरांमुळे ओळखले जाते. सुवार्डा डोंगरावरील होळीप्रमाणेच येथे शिमगोत्सवात जपली जाणारी ‘कळसवणी’ ही परंपरा गावाच्या सांस्कृतिक वारशाचे अनमोल प्रतीक मानली जाते.
दरवर्षीप्रमाणे शिमगोत्सवाच्या सातव्या दिवशी मळगावात कळसवणीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडतो. या दिवशी मळगाव पंचायतन देवस्थानचा ‘कुळ’ म्हणजे राऊळ मानकरी आणि ‘थळ’ म्हणजे गावकर मानकरी यांचा कळस गावातील प्रत्येक घरात फिरवण्याची प्रथा आहे. अनेक पिढ्यांपासून जपली गेलेली ही परंपरा मळगावच्या धार्मिकतेचा अविभाज्य भाग बनली असून, आजही गावातील राऊळ व गावकर मानकरी अत्यंत एकोप्याने आणि श्रद्धेने तिचे जतन करत आहेत. हा सोहळा काल (ता. ८) दिमाखात साजरा झाला.
गावाची लोकसंख्या मोठी असल्याने आणि वर्षागणिक नवीन घरे वाढत असल्याने, कळस फिरवण्याचा हा सोहळा पहाटेच सुरू होतो. यंदाही पहाटे सुमारे तीन वाजता राऊळ व गावकर यांच्या उपस्थितीत उत्साहात सुरुवात झाली. कुळ आणि थळ घराण्यांकडून कळस सवाद्य वाजत-गाजत श्री देव रवळनाथ मंदिरासमोरील चव्हाट्याच्या होळीजवळ आणले गेले. तेथे दोन्ही कळसांचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री देव रवळनाथ देवाला धुपारती अर्पण करण्यात आली. देवाला नैवेद्य दाखवून सामूहिक गाऱ्हाणे घातल्यानंतर, गावातील गर्द वनराईत वसलेल्या मायापूर्वचारी व तेथून भूतनाथ मंदिरात तीर्थ घेऊन, महापुरुष मंदिरात पूजाअर्चा करून कळस गावभर फिरवण्याच्या सोहळ्याला प्रारंभ झाला. कळस प्रत्येक घरात पोहोचताच ग्रामस्थांनी पारंपरिक रिवाजाप्रमाणे दीप, अगरबत्ती, फुले आणि नारळ अर्पण करून भक्तिभावाने पूजन केले.
....................
श्रद्धा, शिस्तीसह परंपरेचे दर्शन
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, गावातील राऊळ व गावकर मानकरी अनवाणी पायांनी संपूर्ण गावभर अक्षरशः धावत हा कळस फिरवतात. पहाटेपासून सुरू झालेला हा प्रवास सायंकाळी पाच वाजेपर्यंत अखंड सुरू राहतो. एका दिवसात संपूर्ण गाव फिरवणे कठीण असले तरी, ठरलेल्या वेळेत कळस पोहोचवण्याची परंपरा आजही तेवढ्याच जिद्दीने आणि निष्ठेने पाळली जाते. कळसवणीचा हा सोहळा श्रद्धा, शिस्त आणि परंपरेचे अनोखे दर्शन घडवणारा क्षण असतो. या धार्मिक कार्यात ज्येष्ठ मंडळींसह तरुण आणि लहान मुलेही उत्साहाने सहभागी होतात. सायंकाळी गावातील सर्व वाड्यांमधील ग्रामस्थ एकत्र येऊन पारंपरिक ‘गाव रोंबाट’ काढतात. हे रोंबाट श्री देव रवळनाथ मंदिरासमोरील चव्हाट्याच्या होळीजवळ येऊन विसर्जित होते. याच ठिकाणी सात दिवसीय शिमगोत्सवाची सांगता करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

