युद्धाची झळ स्वयंपाकघरात
29726
युद्धाची झळ स्वयंपाकघरात
महिन्याला एकच गॅस सिलिंडर ; दरवाढीने नागरिक चिंतेत, व्यावसायिक गॅस तुटवडा
इंट्रो
चिपळूण ः इराण-अमेरिका युद्धामुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठा साखळी काहीशी विस्कळित झाली. मात्र, तालुक्यात स्वयंपाकाच्या घरगुती गॅस सिलिंडरवर कोणताही परिणाम झाला नाही. तरीही अफवांमुळे गेल्या चार दिवसांपासून ग्राहकांकडून बुकिंग होत असल्याने कंपन्यांनी गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमात बदल केला. घरगुती गॅस वाटपात वितरकाचे गॅसवरील नियंत्रण कमी झाले आहे. त्यामुळे गॅसचा होणारा काळा बाजार ९९ टक्के थांबला आहे. ग्राहकाला महिन्यात केवळ एकदाच गॅस दिला जात आहे. त्यामुळे साठेबाजीलाही आळा बसला आहे. चिपळूणमधील सर्व वितरकांना शासनाकडून गॅसचा काळाबाजार आणि साठेबाजीबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत, असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.
-----------
चौकट
छोट्या हॉटेल व्यावसायिकांना फटका
आखाती देशातून डिझेल-पेट्रोल आणि गॅस आयात केले जाते. युद्धामुळे पुरवठा विस्कळीत होऊ लागला आहे. त्याचे पडसाद तालुक्यात उमटू लागले आहेत. शुक्रवारपासून शहरात व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. छोट्या हॉटेल व्यवसायिकांना दुकान बंद ठेवण्याची वेळ आली आहे. घरगुती गॅसच्या बुकिंगवर ही मर्यादा आल्या आहेत. गॅसची टंचाई निर्माण होईल किंवा त्याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता गृहीत धरून नागरिकांनी आगाऊ बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. परंतु कंपनीकडून केवळ महिन्याला एकच गॅसची टाकी दिली जात आहे. त्यामुळे गॅस कंपनीत रिकामे सिलेंडर घेऊन जाणारे ग्राहक पुन्हा रिकाम्या हाती परत येत आहेत.
----------
चौकट
आगामी काळात गॅस टंचाईची चिन्हे
घरगुती गॅस टाकीमागे साठ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आखाती युद्धाची झळ घरापर्यंत पोहोचली आहे. काही गॅस एजन्सीच्या ग्राहकांचीही बुकिंगही होत नाही. ज्यांची होत आहे, त्यांनाही गॅस टाकी वेळेवर मिळण्याची चिन्हे नाहीत. त्यासाठी अधिकृत किती वेळ लागू शकतो, याबाबत सांगण्यास पुरवठा विभागातील अधिकारीही तयार नाहीत. त्यामुळे ती अनिश्चितता आहे. व्यावसायिक गॅसबाबतही तशीच अनिश्चितता आहे. गॅसच्या दरात वाढ घरगुती व व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झालेली आहे. घरगुती गॅसचे दर ६० रुपयांनी, तर व्यावसायिक गॅसचे दर १५० रुपयांनी वाढलेले आहे. आगामी काळात गॅसची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
-------------
चौकट
गॅसचा काळाबाजार थांबला
घरगुती गॅससाठी आता ऑनलाईन बुकींग बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकाने बुकींग केल्यानंतरच त्याला गॅस मिळणार आहे. त्यामुळे बोगस ग्राहक तयार करून गॅसचा होणारा काळाबाजार थांबला आहे. गॅसची बुकींग झाल्यानंतर त्याच्या नोंदणीकृत मोबाईलवरील ओटीपी घेतल्याशिवास गॅसचे वितरण होत नाही. त्यामुळे गॅसचा काळाबाजार थांबला आहे.
--------------------
चौकट
डिलिव्हरी आणि बुकिंगमध्ये किमान ३० दिवसांचे अंतर
पूर्वी एकदा बुकींग केल्यानंतर १५ दिवसांत पुढील सिलिंडर बुक करता येत होता. मात्र, आता डिलिव्हरी आणि पुढील बुकिंग यामध्ये किमान ३० दिवसांचे अंतर असणे बंधनकारक करण्यात आले. हा नियम लागू करण्यासाठी गॅस एजन्सीची बुकिंग प्रणाली आणि सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यात आले आहे. प्रमुख तेल कंपन्यांनी ही नवी व्यवस्था लागू केली असून, पुरवठा व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर नियम कायम घरगुती गॅस सिलिंडर खरेदीसंदर्भातील इतर नियम कायम ठेवण्यात आले. प्रत्येक ग्राहकाला एका आर्थिक वर्षात १२ सिलिंडर मिळतात. त्यानंतर गरज असल्यास तीन सिलिंडर खरेदी करता येतात. म्हणजेच एका गॅस कनेक्शनवर वर्षभरात एकूण १५ सिलिंडर खरेदी करण्याची परवानगी आहे.
----------
कोट
नव्या नियमानुसार आता ग्राहकांना मागील सिलिंडरची डिलिव्हरी मिळाल्यानंतर किमान ३० दिवस पूर्ण झाल्याशिवाय नवीन सिलिंडरची नोंदणी करता येणार नाही. यापूर्वी ग्राहकांना सिलिंडरची डिलिव्हरी बुकिंगनंतर मिळेल. तालुक्यात गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा नाही. सिलिंडरसाठी जिल्ह्यात वेटिंगही नाही. गॅस कंपन्यांनाही वेटिंगसंदर्भात कोणतेही आदेश दिलेले नाहीत. बुकिंगनंतर नियमानुसार ग्राहकांना वेळेत सिलिंडर मिळेल.
--अभिजित महाडिक, पुरवठा अधिकारी, चिपळूण
-----------------------
कोट
व्यावसायिक सिलिंडर घेऊन अनेक हॉटेल व्यावसायिक आपला व्यवसाय करत असतात. मात्र, व्यावसायिक सिलिंडरचा दर वाढत आहेत, तरीही आम्ही घेतो. मात्र, आता तेही जर बुकिंग करून मिळणार नसेल, तर मग आम्ही कोणता गॅस वापरावा हा मोठा प्रश्न या गॅस तुटवड्यामुळे निर्माण झाला आहे.
----मिलिंद कापडी, हॉटेल व्यावसायिक, चिपळूण
---------
चौकट
चिपळूण तालुक्यातील एजन्सी - ०५
ग्राहक - १ लाख ५ हजार ५७०
-----------------------
चौकट
सिलेंडरचे वजन (किलो) जुने दर सुधारित दर
१४.२ ८५६.५० ९१६.५०
१९ १७५६.५० १८९९.५०
४७.५ ४३८८ ६८६५.५०
५ ५३१ ५६६.५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

