

चिपळूणच्या बाधित व्यापाऱ्यांना
३ महिन्यांत टीडीआर प्रमाणपत्र
प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाला सहकार्य; १०५ कोटींचा प्रकल्प
चिपळूण, ता. ९ ः चिपळूण नगरपरिषदेने शहरातील चिंचनाका ते पॉवर हाऊस, तसेच मध्यवर्ती बसस्थानक ते खेंड बावशेवाडी या प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरण प्रकल्प निमित्ताने प्रकल्पामुळे बाधित होणारे व्यापारी व नागरिक यांची बैठक सोमवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बाधित व्यापारी व नागरिकांनी शहराच्या विकासासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली. नगराध्यक्षांनी तीन महिन्यांच्या आत टीडीआर प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले. नकाशे विनामूल्य उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी मान्य केली.
या बैठकीत नगरपरिषदेचे सल्लागार व आर्किटेक्ट नागेश देशपांडे यांनी पीपीटीच्या माध्यमातून रस्ते कशा पद्धतीने उभारले जातील, गटारांची व्यवस्था, रस्त्यांचा दर्जा, फूटपाथ, तसेच संपूर्ण आराखड्याची सविस्तर माहिती दिली. या रस्ते रुंदीकरणासाठी सुमारे १०५ कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर व्यापारी व नागरिकांनी आपल्या शंका व प्रश्न मांडले. या प्रश्नांना नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मुख्याधिकारी संजय जाधव, तसेच नगररचना विभागाच्या श्रीमती खैरमोडे यांनी समर्पक उत्तरे दिली.
यावेळी नगराध्यक्ष सकपाळ म्हणाले की, रस्ते रुंद झाल्यास शहर अधिक सुंदर होईल तसेच दळणवळणाची सुविधा सुधारेल. त्यामुळे चिपळूणची बाजारपेठ अधिक सक्षम होईल आणि व्यापाराला चालना मिळेल. नगर पालिका ‘ब’ वर्गात असल्याने उत्पन्न मर्यादित असले, तरी शहराच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.
बैठकीत डॉ. रत्नाकर घाणेकर यांनी रस्ते रुंदीकरणासाठी निधी व अंडरग्राउंड गटार यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यावर नगराध्यक्षांनी आपण हाती घेतलेले काम अर्धवट सोडणार नाही, अशी ग्वाही दिली. डॉ. प्रकाश पाटणकर यांनी रेड लाईन व ब्ल्यू लाईन संदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यावर नगराध्यक्षांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. अभय चितळे यांनी या रस्ता प्रकल्पाला शंभर टक्के पाठिंबा असल्याचे सांगितले. तसेच टीडीआर प्रमाणपत्र तीन महिन्यांच्या आत मिळावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावर नगराध्यक्षांनी तीन महिन्यांच्या आत प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले. नकाशे विनामूल्य उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी मान्य केली.
डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी वृक्षसंवर्धनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर नगराध्यक्षांनी या ४.४१ किलोमीटरच्या रस्त्यांवर सुमारे ४५० वृक्ष लागवडीची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले. राजू भागवत यांच्या सूचनेनुसार काही वृक्ष नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मुळासकट उचलून अन्य ठिकाणी लावण्याबाबतही विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. नगरसेवक फैसल कासकर यांनी रस्ते रुंदीकरणाची आवश्यकता स्पष्ट करत शहराच्या भविष्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे सांगितले. राजू भागवत यांनी विकासासाठी काही काळ त्रास सहन करावा लागेल, असे मत व्यक्त केले.
या बैठकीला मुख्याधिकारी संजय जाधव, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, आरोग्य विभागाचे वैभव निवाते, सुजित जाधव, उद्यान विभागाचे बापू साडविलकर, पाणीपुरवठा विभागाचे रोहित खाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.