वेरळ धनगरवाडीत ‘जलार्पण’ उत्साहात
वेरळ धनगरवाडीत
‘जलार्पण’ उत्साहात
मसुरे ः वेरळ धनगरवाडी (ता.मालवण) ग्रामपंचायतीसाठी मंजूर झालेल्या जल जीवन मिशनअंतर्गत नळपाणी योजनेचे काम २०२२ मध्ये पूर्ण झाले असून या योजनेचा जलार्पण व हस्तांतरण प्रक्रिया हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती मालवण आणि ग्रामपंचायत वेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत विभाग, मालवण) लक्ष्मण हांडे, सरपंच धनंजय परब, अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा, मालवण) राणी लाड, मनीष सावंत, शुभम त्रिंबककर, ग्रामपंचायत अधिकारी मनस्वी कुणकवळेकर व मुख्याध्यापक राजेंद्र धारपवार आदींनी जल अर्पण व हस्तांतरण प्रक्रिया कार्यक्रमाबाबत विशेष मार्गदर्शन केले. तसेच जल शपथ आणि महिला दिन विशेष महिला सभा घेण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक धारपवार यांनी सूत्रसंचालन केले. मनस्वी कुणकवळेकर यांनी आभार मानले.
---
‘ई-पीक पाहणीस
मुदतवाढ द्यावी’
कणकवली ः ई-पीक पाहणी अॅपद्वारे पीक नोंदणी करताना नकाशाबाबत येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यात यावे. तसेच खरीप भातपीक, आंबा, काजू ई-पीक पाहणी नोंदी व भात खरेदी नोंदीबाबत मुदतवाढ मिळण्याची मागणी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, फोंडाघाटचे चेअरमन राजन नानचे यांनी पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे केली आहे. जमाबंदी आयुक्तांकडून ऑगस्ट २०२५ मध्ये जिल्हाधिकारी यांना पीक पाहणी हंगामादरम्यान शेतकरी प्रत्यक्ष गटात उभे असतानाही गटापासून दूर असल्याचे दाखविण्यात येते. संबंधित शेत ज्या गटात समाविष्ट आहे, त्या गटाचे पोटहिस्सा मोजणी झाल्याचे त्या पोटहिश्श्याचे ‘जीओ रेफरन्सिंग’ तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी अक्षांश-रेखांश अचूक असणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
.....................
‘गणित प्राविण्यात’
विद्यार्थ्यांचे यश
म्हापण ः गणित महाराष्ट्र अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत अण्णासाहेब देसाई विद्यामंदिरच्या (परुळे) आठवीतील तीन विद्यार्थ्यांनी यश मिळविले. विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड व कौशल्य वाढविणे, हा या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे. या परीक्षेत आदिनाथ सामंत या विद्यार्थ्याने तालुक्यात द्वितीय, वरदा सामंत हिने तालुक्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला. चैतन्य परुळेकर यानेही यश प्राप्त केले. हे तिन्ही विद्यार्थी गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षिका मधुरा कदम व पालकांचे मार्गदर्शन लाभले. शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ यांनी या तिन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे गावासह परिसरातून कौतुक होत आहे.
--------
वेंगुर्ले बाजारपेठेत
उद्या गणेशयाग
वेंगुर्ले ः बाजारपेठ नजीकच्या कैवल्यस्वामी ओंकारेश्वर दत्त मंदिर येथे गुरुवारी (ता. १२) सकाळी ११ वाजता पुणे अग्निहोत्र मंडळांतर्फे गणेशयाग आयोजित केला आहे. प्रचार, दिवसभर अग्निहोत्र, सायंकाळी ६.४२ वाजता अग्निहोत्र प्रात्यक्षिक दाखविण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
...................
कवठणीत आज
मालवणी नाटक
सावंतवाडी ः कवठणी-बाळोजीवाडी येथील श्रींची इच्छा नाट्यकला मंडळाच्यावतीने राष्ट्रोळी रंगमंच येथे उद्या (ता. ११) रात्री १० वाजता प्रवीण शांताराम लिखित ‘येवा कोकण आपलाच आसा’ हा दोन अंकी विनोदी मालवणी नाट्यप्रयोग होणार आहे. नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

