गर्भाशयाच्या कर्करोगावर लसीचा उतारा

गर्भाशयाच्या कर्करोगावर लसीचा उतारा

Published on

swt109.jpg
29923
नेरुर : आशा'' स्वयंसेविकांसाठी पद्मश्री डॉ. राणी बंग यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. याप्रसंगी उमेश गाळवणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

गर्भाशयाच्या कर्करोगावर लसीचा उतारा
डॉ. राणी बंग : नेरुर येथे ‘आशा’ स्वयंसेविकांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० : गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे महिलांमधील वाढते प्रमाण पाहता ‘ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस’ लस अत्यंत उपयुक्त आणि सुरक्षित आहे. विशेषतः विवाहपूर्व वयातील म्हणजेच ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी ही लस जीवनदायी ठरू शकते. या वयोगटातील मुलींनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. राणी बंग यांनी केले.
बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट आणि बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या सहकार्याने नेरुर येथील (कै.) यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व रिसर्च सेंटर येथे आयोजित ऑनलाईन व्याख्यानात त्या बोलत होत्या. तालुक्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना मार्गदर्शन करताना त्यांनी ध्वनीचित्रफितीद्वारे या लसीचे महत्त्व पटवून दिले. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजात आरोग्य क्रांती घडवणाऱ्या डॉ. बंग यांनी सामाजिक बांधिलकीतून दुपारी ३.३० ते ५ या वेळेत ऑनलाईन उपलब्ध राहून मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी आशा स्वयंसेविकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्या म्हणाल्या, ‘‘ही लस पूर्णपणे सुरक्षित असून तिचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिफारशीनुसार, केंद्राने महिलांच्या आरोग्यासाठी मोफत राष्ट्रीय एचपीव्ही लसीकरण कार्यक्रम जाहीर केला आहे. यांतर्गत सार्वजनिक आरोग्य यंत्रणेमार्फत ९ ते १४ वर्षांच्या मुलींचे लसीकरण करण्यात येणार आहे.’’
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय, बॅ. नाथ पै फाउंडेशन आणि ‘सोमा हेल्थ’ यांच्यावतीने या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. भारतातील वाढत्या कर्करोग रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त करत, जनजागृती हाच यावर प्रभावी उपाय असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी बॅ. नाथ पै फाउंडेशनच्या अध्यक्षा अदिती पै, शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, प्राचार्य कल्पना भंडारी, डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल, प्रा. वैशाली ओटवणेकर, प्रा. प्रथमेश हरमलकर आणि डॉ. राजेश कापसे उपस्थित होते. या मार्गदर्शनाचा लाभ तालुक्यातील एकूण १४२ आशा स्वयंसेविकांनी घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com