माकडं पकडण्याच्या मोहिमेतील खर्चात मोठी कपात

माकडं पकडण्याच्या मोहिमेतील खर्चात मोठी कपात

Published on

rat11p10.jpg-
O30211
रत्नागिरी ः वनविभागाच्या मोहिमेत पकडलेले वानर.
-------------
माकडांच्या धरपकड मोहिमेला यश
४५० माकड जेरबंद, खर्चात मोठी कपात प्रतिमाकड ७८० वरून ४५० रुपये
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : रत्नागिरी वनपरिक्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून बागायतदार आणि शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणणाऱ्या माकडांचा बंदोबस्त करण्यात वनविभागाला मोठे यश आले आहे. विशेष म्हणजे, शासनाच्या नवीन निर्णयामुळे माकडं पकडण्याच्या दरातही कपात झाल्याने सरकारी तिजोरीवरील भारही हलका झाला आहे. आतापर्यंत ४५० माकडांना सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे; मात्र ज्या भागात माकडं पकडण्यात आली त्या भागात पुन्हा माकडांचा उपद्रव वाढलेला दिसत नाही. त्यामुळे या मोहिमेत भितीने त्या भागात पुन्हा माकडं येत नसल्याचा पाहणी अहवाल वनविभागाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रत्नागिरी वनपरिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात माकडांचा उपद्रव सुरू आहे. अनेक शेतकरी आणि बागायतदारांनी या उपद्रवामुळे शेती करणे सोडून दिले. याबाबत मोठ्या प्रमाणात उठाव झाला. सुमारे साडेतीन ते चार हजाराच्यावर माकडं असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली होती. त्यानंतर माकडे पकडण्याची मोहीम वनविभागाने हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत वनविभागाने ४५० माकडांची धरपकड करण्यात आली. ​पूर्वी एका माकडाला पकडण्यासाठी ७८० रुपयेइतका खर्च वनविभागाला करावा लागत होता; मात्र, राज्यशासनाने संपूर्ण राज्यासाठी आता ४५० रुपये असा एकच दर निश्चित केला आहे. या निर्णयामुळे रत्नागिरी वनविभागाने कमी खर्चात अधिक कार्यक्षमता दाखवली आहे. पकडण्यात आलेल्या ४५० माकडांसाठी सुधारित दराप्रमाणेच खर्च करण्यात आला असून, यामुळे वनविभागाच्या निधीची मोठी बचत झाली आहे.
वनविभागाने जिल्ह्यातील ​लांजा, ​राजापूर, ​संगमेश्वर, ​रत्नागिरी या चार तालुक्यांत ही मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली. ​या चारही तालुक्यात तीन विशेष पिंजऱ्यांच्या मदतीने ही मोहीम राबवण्यात आली. माकडांना पकडताना त्यांची सुरक्षा आणि नियमांचे पालन व्हावे यासाठी प्रत्येक कारवाईचे व्हिडिओ आणि फोटो काढून त्याचे रेकॉर्डिंग ठेवले जात आहे जेणेकरून प्रक्रियेत पारदर्शकता राहील, अशी माहिती रत्नागिरी परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांनी दिली.
------------

चौकट
पकडलेल्या ठिकाणावरील उपद्रव झाला कमी

​ही मोहीम राबवण्याची जबाबदारी माकड पकडणारे जय भगत यांच्यावर सोपवण्यात आली होती. वनविभागाने केलेल्या ताज्या पाहणी अहवालानुसार, भगत यांनी ज्या भागातून माकडं पकडली आहेत त्या भागात पुन्हा माकडांची संख्या वाढलेली नाही किंवा त्यांचा उपद्रव जाणवलेला नाही. हा अहवाल बागायतदारांसाठी मोठा दिलासा देणारा ठरला आहे. या मोहिमेमुळे आंबा, काजू आणि नारळ बागायतदारांनी समाधान व्यक्त केले असून, उर्वरित भागातही अशीच मोहीम सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.


चौकट
वनविभागाच्या अहवालाबाबत संभ्रम

दरम्यान, वनविभागाने ज्या ठिकाणी माकडे पकडली त्या ठिकाणी माकडांचा उपद्रव कमी झाल्याचे म्हटले असले तरी रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी, सोमेश्वर, तोणदे, टेंभ्ये, चांदेराई, हरचिरी, कुरतडे, गुरूमळी, नारायणमळी आदी ठिकाणी अजूनही माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सध्या आंबा हंगाम असल्याने माकडे आणि वानर प्रचंड मनस्ताप देत आहेत. या गावांमध्ये दररोज वानर आणि माकडांमुळे होणाऱ्या त्रासामुळे बागायतदारांना नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे वनविभागाच्या या अहवालाबाबत संभ्रम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com