‘आरती प्रभू’ पुरस्कार हे माझे भाग्यच

‘आरती प्रभू’ पुरस्कार हे माझे भाग्यच
Published on

30301

‘आरती प्रभू’ पुरस्कार हे माझे भाग्यच

प्रा. प्रवीण दवणे : कुडाळात बाबा वर्दम थिएटर्स तर्फे सोहळा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ : प्रतिभावान लेखक चिं. त्र्यं. खानोलकर तथा आरती प्रभू या महान साहित्यिकांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मिळाला, याचा निश्चितच आनंद आहे. बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमीच्या या उपक्रमाचे कौतुक करत असताना मराठी भाषा संवर्धनाची आज गरज आहे, असे प्रतिपादन कवी आणि गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांनी केले. 
येथील बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यंदाचा ‘आरती प्रभू पुरस्कार-२०२६’ प्रसिद्ध कवी, गीतकार प्रा. दवणे यांना येथे झालेल्या शानदार समारंभात चिं. त्र्यं. खानोलकर तथा आरती प्रभू यांच्या जन्मदिनी प्रदान केला. त्यावेळी प्रा. दवणे बोलत होते.
कुडाळचे सुपुत्र असलेले चिं. त्र्यं. खानोलकर तथा आरती प्रभू यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी २०१३ पासून कविता आणि नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कवी किंवा नाटककारास हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. आतापर्यंत १२ जणांना हा पुरस्कार दिला आहे. यंदाचा हा १३ वा आरती प्रभू पुरस्कार वितरण सोहळा येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या (कै.) एकनाथ ठाकूर सभागृहात झाला. आरती प्रभू कला अकादमीचे अध्यक्ष अनंत वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते प्रसाद पंडित, अमेरिका स्थित प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ  डॉ. अनिल नेरुरकर, कमशिप्र मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, ज्येष्ठ दिग्दर्शक आणि बाबा वर्दम थियेटर्सचे संस्थापक चंदू शिरसाट उपस्थित होते. श्री. पंडित यांच्या हस्ते प्रा. दवणे यांनी आरती प्रभू पुरस्कार स्वीकारला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रुपये २१ हजार असे पुरस्काराचे स्वरूप होते. तत्पूर्वी नीलेश जोशी यांनी प्रा. दवणे यांना दिलेल्या मानपत्राचे वाचन केले. डॉ. जी. एस. कुलकर्णी यांनी या मानपत्राचे लेखन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसाद पंडित यांनी आरती प्रभू आणि त्यांचे प्रतिभासंपन्न लेखन याविषयी उहापोह केला. आरती प्रभू यांच्या कवितांचे इंग्रजी भाषेत भाषांतर झाले असते तर कदाचित त्यांना नोबेल पारितोषिकही मिळाले असते, एवढी त्यांची प्रतिभा होती, असे ते म्हणाले. डॉ. नेरुरकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. जी. एस. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, प्रतिभा पाटणकर, कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, कुडाळ तालुकाध्यक्ष संतोष वालावलकर उपस्थित होते. केदार सामंत यांनी प्रास्ताविक केले. नीलेश जोशी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com