

swt1211.jpg
30395
सिंधुदुर्गनगरी : मुख्यालय पत्रकार संघ आयोजित पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेत विजेते ठरलेले मुख्यालय पत्रकार आणि वेंगुर्ले पत्रकार संघासोबत मनीष दळवी, मुकुंद चिलवंत.
मुख्यालय पत्रकार संघाला विजेतेपद
क्रिकेट स्पर्धा : वेंगुर्ले संघ ठरला उपविजेता, गिरीश परब मालिकावीर
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १२ : मुख्यालय पत्रकार संघ आयोजित पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेत यजमान मुख्यालय पत्रकार संघाने विजेतेपद पटकावले, तर वेंगुर्ले पत्रकार संघ उपविजेता ठरला. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेचा प्रारंभ जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत झाला. विशेषतः जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी फलंदाजी करताना दाखवलेला उत्साह उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. पहिला सामना मुख्यालय पत्रकार विरुद्ध कुडाळ संघात झाला, ज्यात मुख्यालय संघ विजयी झाला. सावंतवाडी संघ अनुपस्थित राहिल्याने कणकवली संघाला पुढील चाल देण्यात आली. पहिल्या उपांत्य सामन्यात मुख्यालय संघाने कणकवलीचा पराभव केला. दुसऱ्या बाजूला, मालवण संघ उपस्थित नसल्याने इलेक्ट्रॉनिक मीडियाला पुढे चाल मिळाली; मात्र साखळी सामन्यात दोडामार्गवर विजय मिळवणाऱ्या वेंगुर्ले संघाने उपांत्य सामन्यात इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून मुख्यालय संघाने वेंगुर्ले संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. वेंगुर्ले संघाने आक्रमक सुरुवात करत २४ चेंडूत ५६ धावा उभारल्या. ५७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुख्यालय संघाची सुरुवात सावध झाली; मात्र गिरीश परब यांनी दुसऱ्या षटकात ४ षटकार आणि १ चौकार खेचत तब्बल ३० धावा वसूल केल्या आणि सामन्याचे पारडे फिरवले. शेवटच्या षटकात केतन म्हाडेश्वर यांनी षटकार आणि चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला. यात मालिकावीर गिरीश परब, अंतिम सामनावीर अमित राणे, उत्कृष्ट फलंदाज हर्षल परब, उत्कृष्ट गोलंदाज दत्ता धुरी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रसाद पाताडे यांना गौरविण्यात आले.
श्री. दळवी म्हणाले, ‘‘आजच्या धावपळीच्या काळात निरोगी आयुष्यासाठी मैदानी खेळांची नितांत गरज आहे. मुख्यालय पत्रकार संघाचा हा उपक्रम कौतुकास्पद असून, भविष्यात सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणीही करून घ्यावी.’’
पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, बाळ खडपकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, लवू म्हाडेश्वर उपस्थित होते. वागदे येथील विल्सन क्रीडा मंडळाने स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.