हत्ती कोलझरमधून परतीच्या मार्गाला
30459
swt1212.jpg
30416
कोलझर : येथील जंगलात हत्तींनी काजू झाडांचे नुकसान केले.
कोलझरमधून हत्ती परतीच्या मार्गाला
काजू बागायतदारांचा निःश्वास; पंधरवड्यात बिया सडून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
कोलझर, ता. १२ ः परिसरावर गेले १५ दिवस दहशतीचे सावट निर्माण केलेला चार हत्तींचा कळप आज परतीच्या मार्गाला लागला. आज सकाळी त्यांचे लोकेशन शिरवल-केर गावांच्या हद्दीवरील जंगलमय परिसरात होते. ऐन काजू हंगामात हत्ती दाखल झाल्याने मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागलेल्या बागायतदारांनी तूर्त तरी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. असे असले तरी हत्ती परतण्याची शक्यता कायम असल्याने भीतीचे सावट राहणार आहे.
साधारण १५ दिवसांपूर्वी परिसरात काजूचा हंगाम सुरू झाला. कोलझर, तळकट, शिरवल, झोळंबे या भागात काजूवर अर्थकारण अवलंबून असलेल्यांची संख्या मोठी आहे. बहुसंख्य भाग डोंगराळ आहे. यात संकरीत काजू कलमांची लागवड झाली आहे. साधारण १५ फेब्रुवारीपासून काजू गोळा करण्याचा हंगाम सुरू होतो. अवघ्या महिन्याभरात सगळे उत्पन्न हाती येते. बरोबर याच हंगामात ‘ओंकार’सह एक मोठी मादी आणि दोन पिल्लांचा समावेश असलेला कळप शिरवलमार्गे या परिसरात दाखल झाला. यावेळी त्यांचा बराचसा मुक्काम तळकट आणि कोलझरच्या डोंगराळ भागात होता. येथील बाद्याची राय आणि तळ्याची माठी या परिसरात दिवसा विश्रांती घेऊन हा कळप रात्रीच्यावेळी खाली उतरत असे. या दहशतीमुळे शेतकरी डोंगरात काजू गोळा करायला जाऊ शकत नव्हते. साहजिकच लाखो रुपयांच्या काजू बिया झाडाखालीच पडून सडून गेल्या. यामुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यात सावंतवाडी येथे येत अधिकाऱ्यांना घेरावो घातला होता. हत्तींना जास्तीत जास्त लवकर या भागातून मागे नेण्याची मागणी केली होती.
यानंतर उपलब्ध वन पथकाने हत्तींना परतीचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना यात यश आले नाही. उलट चार दिवसांपूर्वी ओंकार दिवसाढवळ्या तळकट येथील वस्तीत घुसला. तो नेहमीपेक्षा आक्रमक होता. यानंतर दुसऱ्या दिवशी हा कळप थेट झोळंबे-राऊळवाडीपर्यंत पोहोचला. यामुळे दहशत आणखी वाढली. यातच जास्त आक्रमक असलेला ‘बाहुबली’ हा टस्कर अन्य एका मादीसह लगतच्या केरमध्ये दाखल झाला. हा हत्ती कोलझर परिसरात आल्यास उपद्रवमूल्य वाढण्याची भीती व्यक्त होत होती; मात्र बाहुबली पुढे न सरकता मागे घोटगेच्या दिशेने गेला.
या पार्श्वभूमीवर काल (ता. ११) रात्रीपासून ओंकारसह चार हत्तींच्या कळपाने अचानक परतीचा प्रवास सुरू केला. आज सकाळी हे हत्ती शिरवल-केर सीमेवरील सोने जांभळ भागापर्यंत गेल्याचे वनविभागाच्या ड्रोन पाहणीत दिसले. हे लोकेशन पहाटे तीन वाजेपर्यंतचे होते. यानंतर दिवसभरात हत्तींचे लोकेशन मिळाले नाही. असे असले तरी ते परतीच्या प्रवासाला लागल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.
चौकट
भीतीचे सावट
हत्ती परतीच्या प्रवासाला लागले असले तरी ते पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्यावर्षी दीर्घकाळ हत्ती कोलझर परिसरात स्थिरावले होते. सध्या बाहुबलीसह दोन हत्ती आणि ओंकारसह चार हत्ती असे दोन कळप सक्रिय आहेत. ते कळप एकत्र आले तर उपद्रवमूल्य वाढणार आहे. हत्ती केरच्या दिशेने जात असले तरी ते परतण्याची भीती कायम आहे.
चौकट
भोंगा वाजलाच नाही
हत्ती आल्यानंतर स्थानिकांना सूचना मिळावी आणि हत्तींना दूर ठेवण्यासाठी मदत व्हावी, यासाठी हत्ती प्रवण क्षेत्रात भोंगे बसविले आहेत. सोलरवर चालणारे हे भोंगे हत्ती आल्यानंतर संबंधित वनविभागाच्या यंत्रणेमार्फत ऑनलाईन पध्दतीने वाजवले जाणार, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात हत्ती आल्यानंतर ते वाजलेच नाहीत. कोलझर ग्रामस्थांनी वनअधिकाऱ्यांना घेरावो घातला तेव्हा ही स्थिती मांडली होती. त्यानंतर तळकट येथे बसवलेला भोंगा हत्ती आल्यावर वाजू लागला; मात्र कोलझरमध्ये हा भोंगा हत्ती त्याखालून फिरून गेले तरी वाजला नाही.
कोट
दोडामार्ग तालुक्यात सध्या हत्तींचा वावर असल्याने, ऐन काजू हंगामात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही भीती कमी करण्यासाठी हत्ती नेमके कोणत्या ठिकाणी आहेत आणि ते कोणत्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत, याची पूर्वकल्पना शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. हत्तीग्रस्त भागात हत्तींची चाहूल आणि दिशा समजण्यासाठी ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जात आहे. यामुळे वनविभागाकडे हत्तींची इत्थंभूत माहिती उपलब्ध होत आहे. शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. ज्या ठिकाणी आणि ज्या दिशेने हत्ती मार्गक्रमण करत आहेत, त्याचे लोकेशन व माहिती सातत्याने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे.
- सुशांत कांबळे, वनपाल, कोनाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

