हजारो बागायतदार मुख्यालयात धडकले

हजारो बागायतदार मुख्यालयात धडकले
Published on

swt1220.jpg
30490
सिंधुदुर्गनगरी ः येथे बागायतदारांच्या वतीने राजू शेट्टी यांनी पालकमंत्री नीतेश राणे यांना निवेदन सादर केले. शेजारी वैभव नाईक, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व इतर मान्यवर.

हजारो बागायतदार मुख्यालयात धडकले
जोरदार घोषणा : ‘आक्रोश मोर्चा’ ला अभूतपूर्व उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १२ : जिल्हाधिकारी कार्यालयावर आज काढण्यात आलेल्या ‘आक्रोश मोर्चा’ला अभूतपूर्व उपस्थिती लाभली. जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादक आणि व्यापारी हजारोंच्या संख्येने दाखल झाले होते. ‘कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही’, ‘आंब्याला हेक्टरी पाच लाख रुपये द्याच’, अशा प्रकारच्या गगनभेदी घोषणा मोर्चेकऱ्यांनी देत ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय हा मुख्यालय परिसर दणाणून सोडला.
निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादन १० टक्के सुद्धा आलेले नाही. त्यामुळे शासनाने आंब्याला हेक्टरी पाच लाख रुपये, काजूला हेक्टरी तीन लाख रुपये आणि कीटकनाशकांसाठी ५० टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी केली होती; मात्र, राज्याच्या अर्थसंकल्पात याबाबत तरतूद शासनाने केली नसल्याने जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादक आणि व्यापारी आक्रमक झाले होते. आज ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’चे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाच्या मोर्चाला लाखोंची उपस्थिती होती; तेवढी उपस्थिती आजच्या मोर्चाला नसली, तरी तो मोर्चा वगळता आतापर्यंत झालेल्या मोर्चांपेक्षा जास्त उपस्थिती या मोर्चाला होती.
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात माजी आमदार वैभव नाईक, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, राजन नाईक, जयप्रकाश चमणकर, शामसुंदर राय, राजन तेली, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विलास गावडे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष अमित सामंत, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, एम. के. गावडे, अमरसेन सावंत, विजय प्रभू, जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, गणेश गावकर यांच्यासह विविध पक्षांचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
दुपारी साडेअकरा नंतर हा मोर्चा ओरोस फाटा येथून विविध घोषणा देत हजारोंच्या संख्येने निघाला. डॉन बॉस्को स्कूलमार्गे जिल्हा परिषद समोरून जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारासमोर हा मोर्चा विसावला. त्यानंतर तेथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मोर्चाचे नेतृत्व करणारे राजू शेट्टी यांच्यासाठी एकच खुर्ची व्यासपीठावर ठेवली होती; बाकी सर्वजण उभे होते.

चौकट
पालकमंत्री गेले सामोरे
श्री. शेट्टी उपस्थित मोर्चेकऱ्यांना संबोधित करत असताना पालकमंत्री नीतेश राणे यांचे व्यासपीठावर आगमन झाले. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सतीश सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे आदी अधिकारीही व्यासपीठावर दाखल झाले होते.

चौकट
सरकारतर्फे आश्वासन
यावेळी श्री. शेट्टी यांनी आपल्या मागण्या मांडत निवेदन पालकमंत्री राणे यांना दिले. त्यानंतर पालकमंत्री राणे यांनी ‘‘आमचे सरकार तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला न्याय मिळणार,’’ असे आश्वस्त केले. त्यानंतर अन्य वक्त्यांनी मोर्चाला अनुसरून भाषणे केली. यानंतर पुन्हा राजू शेट्टी यांनी भाषण करून आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. मंत्री राणे यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले असले, तरी जोपर्यंत शासन आदेश निघत नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आक्रोश मोर्चा आणि सभेचा समारोप झाला.
............................
टीप ः वरच्या बातमीत हे क्लब करावे.

९० टक्के नुकसानीचा अहवाल सादर
नीतेश राणे : जनता रस्त्यावर असताना मी अधिवेशनात कसा बसू ?
‘‘बागायतदार, शेतकरी ही माझी जनता आहे. ते रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसू शकत नाही! सरकार म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आपल्या मोर्चाला सामोरे आलो आहे. आंबा आणि काजू पिकाचे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. माझ्या सूचनेनंतर, ९० टक्के नुकसान झाल्याचा सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल शासनाकडे तातडीने सादर झाला आहे. नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल, तसेच अन्य प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर मी स्वतः बैठक घेणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आंबा शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेतली असून, शब्दापलीकडे कृती करून सरकार आंबा व काजू बागायतदारांना न्याय देईल,’’ असा विश्वास मंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्गनगरी येथे शेतकरी नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील आंबा-काजू बागायतदारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर, पालकमंत्री राणे आंदोलनाच्या व्यासपीठावर दाखल झाले. यावेळी ते म्हणाले, "या मोर्चात सहभागी झालेले बागायतदार माझ्या जिल्ह्यातील जनता आहे. त्यांच्यावर होणारा अन्याय मी सहन करणार नाही. नुकसान भरपाईसाठी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेला नुकसानीचा चुकीचा अहवाल मी बदलून घेतला आहे."
व्यासपीठावर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होत्या. त्यांनी जिल्ह्यात ९० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठवला असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. राजू शेट्टी यांनी केलेल्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, मुख्यमंत्र्यांसोबत तातडीने बैठक घेण्यात येईल. "बागायतदारांना पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही. शाळांच्या संचमान्यतेचा प्रश्न ज्याप्रमाणे सोडवला, त्याच धर्तीवर बागायतदारांचे प्रश्नही मार्गी लावले जातील. कोकणासाठी मदतीचे निकष वेगळे असावेत, असा विचारही सरकार नक्की करेल," असेही त्यांनी नमूद केले. पालकमंत्री स्वतः मोर्चाला सामोरे आल्याने राजू शेट्टी यांनी मंत्री नीतेश राणे व सरकारचे कौतुक केले.
............................
बातमी क्र. २

आता मागे हटणार नाही
आंबा नुकसान : शेतकऱ्यांसह राजकीय नेत्यांचा सूर
लीड
"आंबा पिकाला हेक्टरी पाच लाख, काजू पिकाला हेक्टरी तीन लाख रुपये, तसेच कीटकनाशकांवर ५० टक्के अनुदान जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत जिल्ह्यातील संघटित शेतकरी मागे हटणार नाही," अशा तीव्र भावना सिंधुदुर्गनगरी येथील आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी, राजकीय प्रतिनिधींनी व्यक्त केल्या.
....................
जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार आणि व्यापारी महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज सिंधुदुर्गनगरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ''आक्रोश मोर्चा'' काढण्यात आला. यावेळी शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा संताप अनावर होता. "इतिहासात प्रथमच निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा आणि काजू उत्पादनाचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात आमचा कोणताही दोष नाही. या संकटामुळे आम्ही घेतलेली कर्जे फेडू शकत नाही, तसेच दलालांकडून घेतलेले पैसेही परत करू शकत नाही," अशा भावना मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केल्या.
.....................
जिल्ह्यात यापूर्वी कधीही शेतकऱ्यांची एवढी मोठी ताकद एकवटली नव्हती, ती आज दिसून आली. जिल्ह्यातील शेतकरी स्वयंस्फूर्तीने यात सहभागी झाले आहेत. ही एकी कायम राहिली पाहिजे. आता न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही. मी कोणत्याही विशिष्ट पक्षाचा म्हणून नव्हे, तर केवळ शेतकरी म्हणून या आंदोलनात सहभागी झालो आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील.
- संजय गावडे, जिल्हा परिषद सदस्य.
....................
आजच्या मोर्चासाठी कोणीही स्वतंत्र व्यवस्था केलेली नव्हती, तरीही राजकीय नेत्यांचे डोळे उघडणारी गर्दी झाली आहे. ''गल्लीपासून दिल्लीपर्यंत'' सत्ता दिलेल्या लोकांनी आता जागे व्हायला हवे. महिनाभराच्या नियोजनाला आज यश आले आहे.
- किरण टेंबुलकर
......................
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चेदरम्यान खावटी कर्जमाफीचा विषय लावून धरण्याची विनंती केली. आमच्या जिल्ह्यातील शेतकरी कर्ज थकीत ठेवत नाहीत, त्यामुळे ते कर्जमाफीपासून वंचित राहतात. खावटी कर्जमाफीचे आदेश शासनाने काढले असले तरी अद्याप अनुदान प्राप्त झालेले नाही.
- राजन तेली, माजी आमदार
..........................
आजच्या मोर्चाच्या व्यासपीठावर शासन आणि प्रशासन आले, हेच या आंदोलनाचे यश आहे; मात्र केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवू नका, कारण यापूर्वीच्या कर्जमाफीचे अनुभव कटू आहेत. जोपर्यंत शासन निर्णय निघत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबवायचे नाही.
- डॉ. जयंत परुळेकर
.........................
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांवर यापूर्वी कधीही असे संकट आले नव्हते. या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांचे कौतुक केले पाहिजे. आजवर शेतकरी विम्याच्या मदतीवर समाधानी होता, परंतु आता विम्याच्या रकमेबाबतही अनिश्चितता आहे. जिल्हा बँकेने दिलेली व्याज सवलत केवळ कर्ज भरणाऱ्यांसाठी आहे; मात्र सध्या शेतकऱ्यांकडे व्याजाचे पैसे भरण्यासाठीही रक्कम नाही. हे आंदोलन कोण्या व्यक्तीविरोधात नसून तो शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. पालकमंत्र्यांनी यात वैयक्तिक लक्ष घालावे. कालच्या अर्थसंकल्पात अपेक्षित घोषणा झाली नसली तरी अजूनही वेळ गेलेली नाही. मंत्रिमंडळात शेतकऱ्यांच्या भावना पोहोचवाव्यात. जर मदत मिळाली नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल.
- वैभव नाईक, माजी आमदार
..........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com