ऑफिसमध्ये काम, अन आकाशात धमाके सुरू
कार्यालयामध्ये काम अन् आकाशात धमाके सुरू
सौदीत अडकलेल्या तरुणांची कैफियत : शंभरहून अधिक तरुण एकमेकांच्या संपर्कात
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः आम्ही सौदी अरेबियामध्ये आहोत. येथे आकाशात मोठे धमाके आणि आमचे काम दोन्ही सुरू आहेत. रात्री मोठमोठे आवाज येतात, काही ठिकाणी जाळ दिसतो. नेमके काय सुरू आहे, याचा अंदाज करणे कठीण आहे. हल्ल्याची भीती वाटत आहे, काम सोडून यावे की थोडे थांबून वाट पाहावी, काय करावे समजत नाही, अशी आपबिती गोवळकोट रोड येथील ईरशाद चौगुले या तरुणाने ‘सकाळ’शी बोलताना सांगितली.
चिपळूण तालुक्यातील अनेक तरुण मध्यआशियातील देशात विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित कंपन्यांत काम करत आहेत. चौगुले हा मूळ चिपळूण तालुक्यातील चिवेली गावचा. त्याचे वडील परदेशात नोकरीला असल्यामुळे आई आणि इतर नातेवाइकांसह तो शिक्षणासाठी चिपळुणात आला. गोवळकोट रोड येथील भाड्याच्या सदनिकेत राहून त्याने शिक्षण पूर्ण केले नंतर नोकरीच्या शोधात तो परदेशात गेला. सौदी अरेबियामध्ये माहिती तंत्रज्ञानशी संबंधित एका कंपनीत तो आता नोकरी करतो. त्याच्या कंपनीत राज्यातील शंभरहून अधिक तरुण नोकरीला आहेत. हे सर्वजण एकमेकांच्या संपर्कात आहेत. कंपनीने दिलेल्या खोलीमध्ये ते राहतात; मात्र तेथील परिस्थिती बिकट होत असल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. ईरशादच्या ग्रुपचा प्रमुख कर्नाटकचाच आहे. तो सर्वांना आधार देतोय.
ईरशादने ‘व्हॉट्सअॅप कॉल’च्या माध्यमातून ‘सकाळ’शी संवाद साधला. तो म्हणाला, आमच्या कंपनीचे काम सुरूच आहे. रोज सकाळी मी नोकरीला जातो. रात्री परत येतो. उघड्यावर फारवेळ थांबू नका, अशा सूचना आम्हाला देण्यात आल्या आहेत. कारण, आकाशात फिरणारे ड्रोन पाडले जात आहेत. त्याचे तुकडे जमिनीवर आदळत आहेत. काही ठिकाणी आगही पडते आहे. रात्रीचा आवाज घुमतो आहे. दोन दिवसांपूर्वी आमचे राहते घर हादरून गेले आणि आम्ही सारेच पळत रस्त्यावर गेलो. त्यावेळी खरी भीती वाटली आणि गावाकडे परत यावे, असे वाटले. रात्रीचा माहोल भीतीदायक आहे.
ओमानमध्ये असलेला महामुद शेख म्हणाला, माझ्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयास माझ्याबद्दल माहिती कळवली आहे. येथे आम्हाला ‘इंडियन ॲम्बसी’मध्ये संपर्क साधण्यासाठी क्रमांक देण्यात आले आहेत. रोज तीन ते चारवेळा विविध ‘अलर्ट’ येत आहेत. आमची काळजी घेतली जात आहे. आम्ही ठरवले तर परत येऊ शकतो; मात्र बहुतांश तरुणांचे मत आहे की, थोडे थांबून पाहूया. लगेच निर्णय घ्यायला नको. आम्ही दक्ष राहून काम करतोय. लवकर युद्ध थांबेल, अशी अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

