‘सामाजिक बांधिलकी‘ला 
ज्येष्ठ नागरिकतर्फे देणगी

‘सामाजिक बांधिलकी‘ला ज्येष्ठ नागरिकतर्फे देणगी

Published on

‘सामाजिक बांधिलकी‘ला
ज्येष्ठ नागरिकतर्फे देणगी
सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानतर्फे रुग्णांच्या सेवेसाठी घेण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकेसाठी अण्णा देसाई व प्रा सुभाष गोवेकर यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिक संघाकडून ५१ हजार ५०० रुपयांची देणगी देण्यात आली. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान जिल्हास्तरावर करत असलेले सेवाभावी कार्य अतिशय उत्कृष्ट आहे, याचा अनुभव आम्ही नेहमी घेतो, अशा शब्दांत ज्येष्ठ नागरिकांनी संस्थेचा गौरव केला. यावर, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर राहील, अशी ग्वाही रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक संघाला आभारपत्र देण्यात आले. या प्रसंगी दिगंबर पावसकर, प्रकाश राऊळ, राजेंद्र बिर्जे, श्रीमती विदुल पाटकर, अण्णा देसाई, मेघना राऊळ, अमोल चव्हाण, गुरुनाथ कदम, रवी जाधव आणि रूपा मुद्राळे उपस्थित होते.
.......
बांदा येथे २८ ला
खुली वाचक स्पर्धा
बांदा : प्रसिद्ध साहित्यिक (कै.) प्र. श्री. नेरूरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, नेरूरकर परिवारातर्फे पुरस्कृत ‘खुली वाचक स्पर्धा’ २८ ला नट वाचनालयात आयोजित केली आहे. ही स्पर्धा सायंकाळी साडे चार वाजता होणार आहे. स्पर्धा सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील साहित्यप्रेमींसाठी मर्यादित आहे. स्पर्धकांनी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर किंवा व. पु. काळे यांच्या साहित्यावर परीक्षणात्मक विचार मांडायचे आहेत. प्रत्येक स्पर्धकाला १० मिनिटांचा वेळ दिला जाईल. विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. इच्छुकांनी आपली नावे २५ तारखेपर्यंत नोंदवावीत, असे आवाहन नट वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
......
ओटवणेच्या विद्यार्थ्याची
अभ्यास दौऱ्यासाठी निवड
ओटवणे : राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत कर्नाटक (बंगळूर) येथे २० ते २३ मार्च या कालावधीत आयोजित अभ्यास दौऱ्यासाठी ओटवणे शाळा क्र. १ मधील सहावीचा विद्यार्थी चंद्रकांत गावकर याची निवड झाली आहे. २०२४-२५ मधील पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत चंद्रकांतने मिळवलेल्या यशाच्या जोरावर ही निवड केली आहे. या दौऱ्यासाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ४५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यात सावंतवाडी तालुक्यातील केवळ ७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. चंद्रकांतच्या या यशामुळे ओटवणे गाव आणि शाळेचे नाव जिल्हास्तरावर चमकले असून, सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.
......
कर्तृत्ववान महिलांचा
सावंतवाडीत गौरव
सावंतवाडी: प्रयाण महिला टुरिझम संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त नगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये कार्यक्रम पार पडला. आमदार दीपक केसरकर यांच्या सहकार्याने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात २०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. यावेळी डॉ. मीनल सावंत यांनी आरोग्य मार्गदर्शन करून प्रोटीन व कॅल्शियमच्या गोळ्यांचे वाटप केले. पी.एस.आय. माधवी मुळीक यांनी ''सायबर सुरक्षा'' आणि ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी नवनिर्वाचित सभापती सुस्मिता जाधव तसेच मनाली राऊत, हेमांगी माने, सुरेखा पवार आणि जयश्री बिर्जे या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. नगरसेविका कीर्ती बोंद्रे, वैशाली पटेकर, अध्यक्षा अपर्णा कोठावळे, भारती मोरे आणि प्रयाण संस्थेच्या संचालिका उपस्थित होत्या.
.......................
मालवण येथे १९ ला
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा
मालवण :हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सण म्हणजे ‘गुढीपाडवा’. या शुभ मुहूर्तावर मालवण येथे १९ ला ‘हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या’ वतीने हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन केले आहे. सायंकाळी ५ वाजता ही यात्रा निघणार असून, मालवणवासीयांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. यावर्षी कोल्हापूर येथील ‘श्रीमंत योगी मर्दानी आखाडा’ यांच्याद्वारे सादर केले जाणारे साहसी मर्दानी खेळ,ढोल-ताशांच्या गजरात निघणारे आकर्षक चित्ररथ, दिमाखदार घोडे आणि विविध जिवंत देखावे,कै. आना मेस्त्री ग्रुप (नेरूर) यांच्या वतीने सादर होणारा भव्यदिव्य शिमगोत्सवाचा कार्यक्रम आदी प्रमुख आकर्षण असेल. या सोहळ्याचे निमित्त साधून ऐतिहासिक, पौराणिक आणि पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आयोजित केली आहे. त्याचे बालवाडी ते चौथी, पाचवी ते दहावी, महिला आणि पुरुष खुला असे चार गट असतील. प्रत्येक गटातील पहिल्या ५ विजेत्या स्पर्धकांना विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल. स्वागत यात्रेची सुरुवात दत्त मंदिर, भरड येथून होईल. तिथून ही यात्रा भरड बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळ येथे पोहोचेल. याच ठिकाणी यात्रेचा भव्य सांगता सोहळा पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com