पोलीस संघाच्या यशात सिंधुदुर्ग सुपुत्राचे योगदान
पोलीस संघाच्या यशात
सिंधुदुर्ग सुपुत्राचे योगदान
क्रिकेट स्पर्धा: संदेश चव्हाण यांचे मार्गदर्शन
तळेरे, ता. १२ : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात राज्य पोलीस संघाने आरपीएफ (RPF) संघाचा पराभव केला. या विजयासह ‘दुसऱ्या ऑल इंडिया पोलीस क्रिकेट’ स्पर्धेच्या विजेतेपदावर महाराष्ट्राने आपले नाव कोरले आहे. दिवस-रात्र खेळल्या गेलेल्या या सामन्यात महाराष्ट्र पोलीस संघाने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन केले. सिंधुदुर्गचे सुपुत्र संदेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने हे यश संपादन केले आहे.
अंतिम सामन्यात आरपीएफने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र महाराष्ट्राच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. कर्णधार सुनील पाटील, रोहित पोळ, योगेश पाटील, श्रीकांत लिंबोळे आणि योगेश शिंदे यांच्या फटकेबाजीमुळे महाराष्ट्राने निर्धारित २० षटकांत २५१ धावांचा डोंगर रचला. २५२ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या आरपीएफला मध्यमगती गोलंदाज रोहित बेहरे याने सुरुवातीलाच धक्के दिले. त्याने ५ बळी घेत आरपीएफची कंबरडी मोडली. त्याला योगेश शिंदे यांनी मोलाची साथ दिली.
या स्पर्धेत महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले होते. बंगळूर येथील अलूर मैदानावर सीआयएसएफ, झारखंड, गोवा आणि गुजरात या संघांना पराभूत करून महाराष्ट्र ‘पश्चिम विभाग’ विजेता ठरला होता. त्यानंतर ग्रेटर नोएडा येथे सीमा सशस्त्र दलावर विजय मिळवत संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य सामन्यात गतविजेत्या आणि प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या दिल्ली संघाचा पराभव करून महाराष्ट्राने गेल्या वर्षीच्या पराभवाचा वचपा काढला आणि दिमाखात अंतिम फेरी गाठली.संघाच्या या यशात प्रशिक्षक रोहन बगाडे आणि संदेश चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

