पाक पोषण
पाक-पोषण - लोगो
(७ मार्च टुडे ३)
पिठलं भाकरी जगभरात सुपरफूड
गेल्या ५० वर्षात महाराष्ट्रातील घराघरांमध्ये झालेला एक मोठा बदल म्हणजे स्त्रियांचे अर्थार्जन करण्यासाठी घराबाहेर पडणे. यामुळे स्त्रियांच्या स्वयंपाकघराचे स्वरूप आणि स्वयंपाकाची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. आज वेळेचे नियोजन हे मुख्य आव्हान आहे. नोकरी आणि घर सांभाळताना पारंपरिक चव कशी टिकवायची, ही तारेवरची कसरत आहे; मात्र, मिक्सर, ओव्हन आणि गॅससारख्या विविध साधनांमुळे शारीरिक कष्ट कमी झाले आहेत. आज अनेक पुरुष हौसेने तर कधी कधी गरज म्हणूनही स्वयंपाकघरात मदत करतात. सुटीच्या दिवशी विशेष पदार्थ बनवणे किंवा रोजच्या कामात हातभार लावणे, यामुळे स्वयंपाकघरातील कामाचे स्त्रीकरण कमी झाले आहे तसेच शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने घरापासून लांब राहताना स्वयंपाक येणे हे एक आवश्यक जीवनकौशल्य बनले आहे.
- rat१३p१.jpg-
P२६O३०५७६
- संगीता खरात, सहसंचालिका
सृष्टिज्ञान संस्था
-----
महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा अभ्यास करत असताना गेल्या ५० वर्षांत या क्षेत्रात झालेले बदल खूप महत्त्वाचे आहेत. कारण, त्यामधूनच आपली आजची खाद्यसंस्कृती तयार झाली आहे. ५० वर्षांपूर्वीपर्यंत स्वयंपाक हे स्त्रियांचे काम मानले जात होते. मोठ्या कार्यात आचारी वगैरे येत असले तरी स्वयंपाकाची पूर्वतयारी, जेवण वाढणे ते नंतर भांडी घासणे यासाठी त्यांच्या मदतीला स्त्रियाच असत. स्वयंपाक घरात पाटा-वरवंटा, खलबत्ता, उखळ-मुसळसारखी उपकरणे होती तर जेवण शिजवायला चूल, स्टोव्ह यांचा जास्त वापर केला जात होता. कुटुंबे मोठी होती तसेच साठवणुकीची साधने नसल्यामुळे रोज ताजे जिन्नस तयार करावे लागत. त्यामुळे स्वयंपाक हे स्त्रियांसाठी प्रचंड कष्टाचे आणि वेळखाऊ काम होते.
हॉटेल्सची संख्या मर्यादित होती. कधीतरी बाहेर जाऊन खाणे चैनीचे मानले जायचे. किंबहुना आपल्या घरातल्या सदस्यांनी तिकडे जाऊन खाणे हे घरच्या स्त्रियांना कमीपणाचे वाटे. त्यामुळे काही महिलांनी हॉटेलमध्ये मिळणारे पदार्थ शिकून घरीच करायला सुरुवात केली. यात मुख्यत: इडली, डोसा, बटाटावडा, भजी, सँडविचसारखे पदार्थ होते. मुंबई-पुणेसारख्या शहरात तर गेली १०० वर्षे हॉटेल आणि खानावळींची परंपरा आहे; मात्र मध्यमवर्गीय घरांमध्ये घरचे जेवण हेच उत्तम मानले जात होते. एखादा पदार्थ उत्तम झाला आहे तर त्याची तारीफ अगदी हॉटेलसारखी झाला आहे, अशी केली जायची.
हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ‘शेफ’ म्हणून पुरुष आधीपासूनच होते; पण आता घरगुती स्तरावरही पुरुष आपला खाद्यवारसा जपण्यात रस दाखवत आहेत, ही खूप आशादायक गोष्ट आहे.
जागतिक घुसळणीत जेव्हा चायनीज आणि इटालियन पदार्थ घराघरात पोहोचले आहेत तेव्हाच पिठलं-भाकरी ही ‘सुपरफूड’ म्हणून जगभरात ओळखली जात आहे. आपली खाद्यसंस्कृती जपणे ही आता एक मोठी आर्थिक संधीही ठरत आहे. घरगुरती मसाले, लोणची आणि सांडगे यांची विक्री करणाऱ्या बचतगटांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळत आहे. अन्नपूर्णा महिलामंडळासारख्या महिलांच्या संस्था या निव्वळ पोळी-भाजी विक्रीमधून मोठा नफा मिळवू लागल्या आहेत. स्वयंपाकाचे काम करणाऱ्या स्त्रियांना समाजात पैशाबरोबरच प्रतिष्ठा मिळू लागली आहे. यामुळे आपली खाद्यसंस्कृती केवळ पुस्तकात न राहता लोकांच्या ताटात जिवंत राहत आहे.
आज अनेक तरुण मुले-मुली समाजमाध्यमांतून आपल्या आजीच्या पाककृती जगासमोर आणत आहेत. यामुळे डिजिटल स्वरूपात हा वारसा जतन होत आहे. पारंपरिक पाककृतींमध्ये आधुनिकतेचा तडका देऊन आजची पिढी हा वारसा पुढे नेत आहे. आजच्या धावपळीच्या आणि जागतिकीकरणाच्या युगात आपली खाद्यसंस्कृती टिकवून ठेवणे हे केवळ चवीसाठी नाही तर आपल्या अस्मितेसाठी आणि आरोग्यासाठी गरजेचे आहे. कारण, आपली खाद्यसंस्कृती केवळ चवच नव्हे तर आरोग्यही देते. स्थानिक पदार्थांचा वापर केल्याने स्थानिक शेतकऱ्याला रोजगार मिळत आहे. गेल्या पन्नास वर्षांत आपल्या आहारात जगभरातील विविध पदार्थ आल्याने जी घुसळण झाली त्यात भारतीय खाद्यसंस्कृती दिमाखाने उजळून निघाली हेच खरे!
(लेखिका भारतीय पारंपरिक आहार संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

