खेड-शिवतर येथे २१ रोजी स्वामींची पालखी परिक्रमा
स्वामी समर्थ पालखीची २१ ला परिक्रमा
खेड-शिवतर येथे पारंपरिक चित्ररथ ; श्रींना २१०० पुरणपोळीचा नैवेद्य
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १३ : येथील खेड-शिवतर रोड श्रीभैरी भवानीनगर मंदिरात अक्कलकोट निवासी श्रीस्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा कार्यक्रमात २१ मार्च रोजी पालखी परिक्रमा आयोजित केली आहे. यामध्ये लेझिमच्या तालावर चित्ररथ, उंट, हत्तींच्या सहभागाने मंगलमय आणि शांततेच्या वातावरणात निघणाऱ्या ‘न भूतो न भविष्य’ अशा पालखी सोहळ्यात सर्वच महिला स्वामीभक्तांनी भगवी साडी तर पुरुषभक्तांनी पांढरा झब्बा, लेहेंगा असा पारंपरिक पद्धतीचा वेष परिधान करून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे भक्तीमय आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
प्रकटदिन सोहळा कार्यक्रम २० मार्चपासून सुरू होईल. सकाळी ६ वा. श्रींचे पूजन, ७ वा. श्रींचे जन्मोत्सव कीर्तन त्यानंतर लघुरूद्र, श्रींचा मुखवास, सायंकाळी दिंडी सोहळा आणि मंदिर परिसरात सवाद्य पालखी परिक्रमा सोहळा होईल. सायंकाळी महाप्रसाद व संगीत कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वा. मंदिरातून पालखीचे सवाद्य प्रस्थान होणार असून, ही पालखी महात्मा फुले नगरमार्गे-छत्रपती शिवाजी महाराज चौक-वाणीपेठ-गांधीचौक-पानगल्ली-गुजरआळी-पावसकर नाका - सोनारआळी-बाजारपेठ-हनुमानपेठ-कोष्टी आळी-संत रोहिदास नगर-संतसेना नगर-योगायोग सोसायटीमार्गे श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर श्री भैरी भवानीनगर खेड येथील मंदिरात पालखी येऊन रात्री भोजनाच्या कार्यक्रमाने प्रकट दिन व पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे.
श्रींना २१०० पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे. तरी ज्या स्वामिभक्तांना पुरणपोळी द्यावयाची आहे त्यांनी मंदिरामध्ये सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत जमा कराव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे. ही माहिती श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे संदीप सासने, दिवाकर नांदगावकर, गुणाजी खेडेकर, वैभव जंगम, मंगेश पवार,बाळू वर्मा, उल्हास शेलार यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

