एसटी कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने चिमुरडीवर वेळेवर उपचार

एसटी कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने चिमुरडीवर वेळेवर उपचार

Published on

माणुसकी जिंकली; एसटी थेट रुग्णालयात
चिमुरडीवर वेळेत उपचार ; चालक-वाहकांना प्रवाशांची साथ
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १३ ः एसटी महामंडळाचे ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य केवळ बसच्या फलकावर लिहिण्यापुरते मर्यादित नसून, ते एसटी कर्मचाऱ्यांच्या आणि प्रवाशांच्याही रक्तात भिनलेले आहे, याचा प्रत्यय संगमेश्वरमध्ये आला. धावत्या एसटीमध्ये प्रकृती खालावलेल्या एका नऊ वर्षांच्या चिमुरडीला चालक-वाहक, वाहतूक नियंत्रक विश्वास फडके आणि बसमधील प्रवाशांच्या मदतीमुळे वेळेवर उपचार मिळाले आणि माणुसकीचे एक आगळेवेगळे दर्शन घडले.
रत्नागिरी-चिपळूण ही एसटी बस काल (ता. १२) संध्याकाळच्या सुमारास संगमेश्वर येथून मार्गस्थ झाली होती. या बसमध्ये मंडणगड येथे जाण्यासाठी एक कुटुंब आपल्या नऊ-दहा वर्षांच्या मुलीसह प्रवास करत होते; मात्र, प्रवासादरम्यान अचानक त्या मुलीची प्रकृती बिघडली आणि तिला आकडी येऊ लागली. मुलीची ती अवस्था आणि पालकांचा टाहो पाहून बसमध्ये एकच खळबळ उडाली. अशा कठीणप्रसंगी एसटीतील प्रवाशांनीही संवेदनशीलता दाखवली. मुलीची अवस्था पाहून प्रवाशांनी गोंधळून न जाता त्या पालकांना मायेचा आधार दिला. काळजी करू नका, दवाखाना जवळच आहे, असे म्हणत प्रत्येकाने त्या कुटुंबाला धीर दिला. बसमधील इतर प्रवाशांनी विलंबाचा विचार न करता त्या मुलीला तातडीने दवाखान्यात नेण्याच्या चालक-वाहकांच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला. प्रवाशांच्या या समजूतदारपणामुळे यंत्रणेला वेगाने हालचाली करणे शक्य झाले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बसच्या चालक आणि वाहकाने क्षणाचाही विलंब लावला नाही. त्यांनी बस नियोजित मार्गाऐवजी थेट संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेने वळवली. चालक-वाहकांच्या या तत्परतेमुळे त्या चिमुरडीला अगदी वेळेवर उपचार मिळणे शक्य झाले, ज्यामुळे पुढील अनर्थ टळला.
------
वाहतूक नियंत्रकांनी घेतली धाव
या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वरचे वाहतूक नियंत्रक विश्वास फडके यांनी क्षणार्धात ग्रामीण रुग्णालय गाठले. केवळ एक अधिकारी म्हणून कर्तव्य न बजावता त्यांनी त्या हतबल झालेल्या पालकांना मोठा आधार दिला. डॉक्टरांची भेट घेऊन मुलीच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि उपचार नीट सुरू असल्याने समाधान व्यक्त केले. त्यांनी केवळ धीरच दिला नाही तर रात्रीच्यावेळी त्या पालकांची जेवणाची उत्तम व्यवस्था केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com