कळंबस्तेतील बोटॅनिकल गार्डन बहरली

कळंबस्तेतील बोटॅनिकल गार्डन बहरली

Published on

- ratchl१३३.jpg-
P२६O३०६२३
चिपळूण ः कळबंस्ते येथे लोकसहभागातून बहरणारे ‘देवराई-बोटॅनिकल गार्डन’.
----
कळंबस्ते येथे लोकसहभागातून ‘बोटॅनिकल गार्डन’
पर्यावरण संवर्धनासाठी देवराई उभारणी; दुर्मिळ वृक्षप्रजातींचा संगम, आज उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः चिपळूणच्या वैभवात भर घालणारी कळंबस्ते येथील देवराई अंतर्गत ‘बोटॅनिकल गार्डन’ बहरू लागले आहे. तालुक्यात प्रथमच लोकसहभागातून साकारलेल्या या देवराईचे पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते शनिवारी (ता. १४) सायंकाळी ५ वा. उद्‍घाटन होणार आहे. या देवराईत तब्बल २५०हून अधिक प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत.
कोकणातील देवरांचे कालानुरूप अस्तित्व कमी होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी व दुर्मिळ होत चाललेली वृक्षसंपदा आणि देवरायांचे अस्तित्व पुन्हा निर्माण करण्याकरिता प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पुढाकार घेतला. प्रांताधिकाऱ्यांनी पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी, सेवाभावी संस्था, खासगी कंपन्या, शाळा आणि महाविद्यालये, शासकीय कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून कळंबस्ते येथे रेल्वेफाटकाजवळ साडेतीन एकर जागेत देवराई अंतर्गत बोटॅनिकल गार्डन उभारली. गेली अनेक वर्षे ही जागा पडीक होती; मात्र देवराईच्या कामामुळे येथील परिसर बहरून गेला आहे. लोकसहभागातून येथे सातत्याने काम सुरू असते. शासकीय कामकाजाव्यतिरिक्त एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून प्रांताधिकारी लिगाडे सहकाऱ्यांच्या मदतीने देवराई बहरण्यासाठी मेहनत घेत आहेत. या देवराईत तब्बल देशी प्रजातीची २५० हून अधिक झाडे लावली आहेत. विद्यार्थ्यांना त्याचा शास्त्रोक्त अभ्यास करता यावा यासाठी प्रत्येक झाडाला क्युआर कोड लावला आहे. सर्व झाडांना ठिंबक सिंचनद्वारे पाणी दिले जाते. साडेतीन एकर परिसरास संरक्षक जाळी घालण्यात आल्याने मोकाट जनावरांचा त्रास कमी झाला.
अनेक दुर्मिळ फुलांचे ‘बोटॅनिकल गार्डन’ नागरिकांसाठी खुले होणार आहे. शनिवारी उद्‍घाटन कार्यक्रमास आमदार शेखर निकम, भास्कर जाधव, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या सीईओ वैदेही रानडे आदी उपस्थित राहणार आहेत. या वेळी नागरिक, निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमींनी उपस्थिती राहावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, सह्याद्री निसर्गमित्रचे भाऊ काटदरे, तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी केले आहे.
----
बाग पाहण्यासाठी पक्क्या पायवाटा
विद्युतप्रकाशासाठी या परिसरात सोलारसिस्टिम उभारली आहे. गार्डनची पाहणी करण्याची पक्क्या पायवाटा बांधल्या आहेत. सात महिन्यापूर्वी सुमारे १३०० रोपे लावण्यात आली होती. पाच-सहा महिन्यात ६०० ते ७०० रोपे नष्ट झाली. पुन्हा त्याच जातीची तेवढीच रोपे, रत्नागिरी, पुणे आदी विविध ठिकाणांहून आणत त्याची लागवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com