४१ हजार फुकट्या प्रवाशांना कोरेचा दणका

४१ हजार फुकट्या प्रवाशांना कोरेचा दणका

Published on

कोकण रेल्वेचा ४१ हजार फुकट्या प्रवाशांना दणका
प्रशासनाची फेब्रुवारीत धडक कारवाई ; वर्षभरात २५ कोटींचा दंड वसूल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः कोकण रेल्वेने विनातिकीट आणि नियमबाह्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध राबवलेल्या धडक मोहिमेत चालू आर्थिक वर्षात तब्बल २५ कोटी २१ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. केवळ फेब्रुवारी २०२६ या एकाच महिन्यात रेल्वेने राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमांमध्ये ४१ हजार सव्वादोन कोटींहून अधिक रुपयांची वसुली करत फुकट्या प्रवाशांचे धाबे दणाणले आहेत.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने फेब्रुवारी या एकाच महिन्यात विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध जोरदार मोहीम राबवली आहे. या मोहिमेत हजारो प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, रेल्वेने कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोकण रेल्वेने फेब्रुवारी २०२६ मध्ये नियमित तिकीट तपासणीसोबतच ८७३ विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेदरम्यान एकूण ४१ हजार ५२२ विनातिकीट किंवा अनियमित प्रवासाची प्रकरणे उघडकीस आली. त्या प्रवाशांकडून रेल्वेभाडे आणि दंडापोटी २ कोटी ४१ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ पर्यंत कोकण रेल्वेने एकूण १० हजार ३६८ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या आहेत. त्यामध्ये आतापर्यंत ४ लाख ५४ हजार ८४९ अनधिकृत प्रवासी आढळले असून, त्यांच्याकडून एकूण २५ कोटी २१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
प्रामाणिक प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि सुलभ व्हावा यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. प्रवाशांनी प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
----
चौकट
सणांच्या काळात कडक लक्ष
पुढील काळात येणाऱ्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने आपली तपासणी यंत्रणा अधिक सतर्क केली आहे. रेल्वेसुरक्षा बल आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने संपूर्ण मार्गावर ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com