कोकण हापूसची निर्यात साखळी विस्कळीत होण्याची भीती

कोकण हापूसची निर्यात साखळी विस्कळीत होण्याची भीती

Published on

31041


कोकण हापूसची निर्यात साखळी विस्कळीत होण्याची भीती

कोकणचा राजा मानला जाणारा ‘हापूस’ यंदा निसर्ग आणि जागतिक राजकारण अशा दोन्ही बाजूंच्या कचाट्यात सापडला आहे. आखातातील युद्धाचा थेट परिणाम भारताच्या कृषी निर्यातीवर होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी १५ ते २० मार्च दरम्यान हापूसच्या निर्यातीचा हंगाम मोठ्या उत्साहात सुरू होतो; मात्र यंदा उत्पादन कमी असल्याने विलंब झाला आहे. परंतु हापूसची आवक वाढण्याच्या कालावधीत आखाती देशांमधील तणाव निवळला नाही, तर निर्यातीची संपूर्ण साखळीच विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड हे तीन जिल्हे देशाच्या एकूण आंबा निर्यातीत ६० ते ७० टक्के वाटा उचलतात. दरवर्षी साधारण १.७ लाख मेट्रिक टन हापूसचे उत्पादन होते, ज्यापैकी २० ते २५ हजार मेट्रिक टन आंबा परदेशात पाठवला जातो.
संयुक्त अरब अमिराती ही हापूससाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे, तर अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपीय देशांतही याला मोठी मागणी असते. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे लॉजिस्टिक खर्च वाढल्यास किंवा वाहतुकीचे मार्ग बंद झाल्यास आर्थिक फटका बसू शकतो. यंदा आंबा बागायतदार केवळ युद्धाच्या छायेमुळेच नाही, तर निसर्गाच्या अवकृपेमुळेही हतबल झाला आहे. कृषी विभाग आणि कोकण कृषी विद्यापीठाच्या सर्वेक्षणानुसार, प्रतिकूल हवामानामुळे मोहोराचे मोठे नुकसान झाले असून उत्पादनात तब्बल ८० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता आहे. झाडांना फळधारणा कमी झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठेतही हापूसचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.
या संकटाचा परिणाम केवळ ताज्या फळांवरच मर्यादित नाही, तर कोकणातील प्रक्रिया उद्योगावरही होणार आहे. एकूण उत्पादनापैकी मोठा हिस्सा आंब्याचा पल्प (रस) काढण्यासाठी वापरला जातो आणि या रसाची ८५ टक्के निर्यात युरोपीय देशांना केली जाते. वाहतुकीचे मार्ग महागडे आणि कठीण झाल्यामुळे प्रक्रिया केलेला मालही परदेशात पाठवणे कठीण होईल. अशा प्रकारे उत्पादनातील प्रचंड घट आणि जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता यांमुळे कोकणचा आंबा बागायतदार यंदा पूर्णपणे कोंडीत सापडला असून, परिस्थिती काय वळण घेते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

चौकट
निर्यातीवर मर्यादा ः पानसरे
वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनीही या परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, आखाती प्रदेशातील असुरक्षिततेमुळे विमान वाहतूक (एअर कार्गो) आणि सागरी व्यापारावर मर्यादा येऊ शकतात. सध्या या परिसरातील निर्यात पूर्णतः बंद आहे. मुंबईत येणाऱ्या एकुण हापूस आंब्यापैकी ३५ टक्के आखाती देशात निर्यात होतो. यंदा उत्पादन कमी असले तरीही निर्यातीला मर्यादा येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com