कोकणच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय
31213
कोकणच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय
नीलेश राणे : सावंतवाडी येथे प्रतिपादन, दशावतार नाटकाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता.१६ : ‘‘मी आज जो काही आमदार आहे आणि विधिमंडळात जनतेचा आवाज उठवू शकत आहे, ते केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासामुळे शक्य झाले आहे. माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी कोकणावर जे अपार प्रेम केले, त्या प्रेमाखातर कोकणच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न उराशी बाळगून काम करत आहे,’’ असा ठाम विश्वास शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी व्यक्त केला.
आमदार राणे यांच्या वाढदिवसानिमित्त येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी केक कापून आणि पारंपरिक दशावतार नाटकाचे उद्घाटन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याचे औचित्य साधून, सामाजिक बांधीलकी जपत गुरू मठकर यांच्या वतीने ५० सायकलींचे वाटप करण्यात आले.
या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. यामध्ये माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाप्रमुख नारायण राणे, दिनेश गावडे, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, महिला जिल्हाध्यक्षा ॲड. नीता कविटकर-सावंत, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत, सुधा कवठणकर, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, योगेश तेली आदी उपस्थित होते.
आमदार राणे म्हणाले, ‘‘संजू परब आणि त्यांच्या मित्रमंडळाने नेहमीच माझ्या सुख-दुःखात साथ दिली आहे. राजकारणात अनेक चढ- उतार येतात; मात्र माझ्या कार्यकर्त्यांनी मला महत्त्वपूर्ण साथ दिली. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवताना दत्ता सामंत यांच्यासारख्या अनुभवी नेत्याची साथ मिळाली. कोकणच्या विकासासाठी कणभर जरी योगदान देऊ शकलो, तरी स्वतःला भाग्यवान समजेन. विधिमंडळात काम करताना आमदार दीपक केसरकर यांचे मार्गदर्शन नेहमीच आधारवड ठरते.’’
दरम्यान, वाढदिवसानिमित्त आयोजित दशावतार नाटकाला रसिकांनी मोठी गर्दी केली. शिवसेना जिल्हाप्रमुख परब यांचा त्यांच्या कार्यपूर्तीनिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. आमदार केसरकर, आमदार राणे व परब यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट देऊन सन्मानित करण्यात आले. सायकल वाटप आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे या सोहळ्याला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
---
विकासकामांच्या आठवणींना उजाळा
आमदार केसरकर म्हणाले, ‘‘नीलेश राणे यांनी खासदार म्हणून यापूर्वी उत्तम काम केले आहेच; पण आता आमदार म्हणूनही ते विधिमंडळात आणि मतदारसंघात धडाकेबाज कामगिरी करत आहेत.’’ यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील विकासकामांच्या आठवणींनाही उजाळा दिला. जिल्हाप्रमुख परब म्हणाले, ‘‘गेल्या १७ वर्षांपासून आमदार नीलेश राणे यांचा वाढदिवस साजरा करत आहोत. ते स्वभावाने कठोर वाटत असले तरी आतून फणसासारखे गोड आहेत. माझ्या राजकीय जडणघडणीत त्यांचे सिंहाचा उल्लेखनीय योगदान आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

