देवगडात राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात

देवगडात राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात

Published on

31414

देवगडात राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात

केळकर महाविद्यालयात आयोजन; पुरस्कारांचेही वितरण

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १६ : येथील स. ह. केळकर महाविद्यालय आणि सोलापूर इतिहास संशोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारताच्या जडणघडणीत महिलांचे योगदान’ व ‘कोकण पर्यटन’ या विषयांवर दोन दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात झाले. या अधिवेशनामध्ये विविध विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले.
सभापती एकनाथ तेली, ज्येष्ठ विचारवंत गोपाळ गुरू, ॲड. वर्षा देशपांडे यांच्या उपस्थितीत उद्‍घाटन झाले. प्राचार्य विजयकुमार कुनुरे व परिषदेचे समन्वयक उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे यांनी स्वागत केले. सोलापूर इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय गायकवाड यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा सादर केला. या परिषदेच्या निमित्ताने ७० पेक्षा जास्त संशोधनपर लेखांचा समावेश असलेले ‘संशोधन नियतकालिक’ प्रकाशित केले.
या परिषदेचे औचित्य साधून दोन प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात कलावती संभाजी जावळे स्मृती संघर्ष गौरव पुरस्कार ॲड. वर्षा देशपांडे (सातारा), अनुसया गायकवाड स्मृती संघर्ष गौरव पुरस्कार प्रा. नागेश दप्तरदार (देवगड), विविध मराठी चित्रपटांतील भूमिकांबद्दल सोलापूरचे संजय साठे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल विवेक चव्हाण (खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला) आणि गुरुप्रसाद घाडी (देवगड महाविद्यालय) यांचाही गौरव झाला.
बीजभाषक गोपाळ गुरू यांनी ‘संशोधन आणि संशोधनाभोवतीचे वास्तव’ सांगितले, की ‘‘वास्तव नाकारून किंवा वास्तवाशी नाते तोडून संशोधक दर्जेदार संशोधन करू शकत नाही.’’ ॲड. वर्षा देशपांडे यांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी लढताना कायदेशीर प्रक्रियेचे दस्तऐवजीकरण करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी उमेश बगाडे प्रेमविवाह व कुटुंब व्यवस्थेतील बदल, सुरेश मैंद यांनी शाश्वत विकास ध्येये व भारतीय महिला, सुधाकर लहुपचांग यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेतील महिलांचा प्रवास, रणजीत हिर्लेकर यांनी कोकणातील कातळ शिल्पांचे ऐतिहासिक महत्त्व, प्रा.दप्तरदार यांनी कोकणातील कासव संरक्षण - अनुभव कथन अशा विषयावर मार्गदर्शन केले. या सत्रांचे अध्यक्षपद डी. पी. गायकवाड, अरुण चव्हाण, शिवाजी वाघमोडे, सज्जन पवार आणि अमिता जावळे यांनी भूषवले. विद्यार्थीनी वेदश्री चव्हाण हिने ‘महिला सक्षमीकरण’ विषयावर सादरीकरण केले. राजेश तेली यांनी सूत्रसंचालन केले. विकास शिंदे यांनी आभार मानले.

Marathi News Esakal
www.esakal.com