

31721
सजग ग्राहक सुदृढ समाजाचा पाया
रवींद्र खेबुडकर : सिंधुदुर्गनगरीत जागतिक ग्राहक दिन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १८ : ग्राहकांनी केवळ आपल्या हक्कांची जाणीव न ठेवता, ग्राहक म्हणून आपली कर्तव्येही जबाबदारीने पार पाडणे महत्त्वाचे आहे. जागरूक, सजग आणि जबाबदार ग्राहक हा सशक्त व सुदृढ समाजाचा पाया असतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले.
ग्राहक संरक्षणाबाबत जनजागृतीच्या उद्देशाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने ‘जागतिक ग्राहक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा इंदुमती मलुष्टे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, शारदा पोवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, जिल्हा ग्राहक समिती सदस्य ॲड. नकुल पार्सेकर आणि जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे उपस्थित होते. प्रास्ताविकात ग्राहक संरक्षण कायद्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
अपर जिल्हाधिकारी साठे म्हणाल्या, ‘‘ग्राहक हा बाजारव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. ग्राहक जागरूक असेल तरच बाजारपेठ पारदर्शक आणि प्रामाणिक राहू शकते. ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना ‘बिल’ घेण्याची सवय लावावी आणि ऑनलाईन व्यवहार करताना विशेष दक्षता बाळगावी. ग्राहकांनी आपले हक्क ओळखून फसवणुकीपासून सावध राहावे.’’
----
ग्राहकांनो, नेहमी जागरूक राहा!
इंदुमती मलुष्टे म्हणाल्या, ग्राहकांनी नेहमी जागरूक राहावे. विशेषतः आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी अधिक सतर्कता बाळगावी. नियमित बँक स्टेटमेंट तपासावे आणि काही शंकास्पद आढळल्यास तत्काळ बँकेशी संपर्क साधावा. वस्तू खरेदी करताना बिल घेणे, उत्पादनावरील माहिती व कालबाह्यता तारीख तपासणे तसेच शंका असल्यास संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवणे, ही ग्राहकांची जबाबदारी आहे. फसवणूक टाळण्यासाठी स्वतः जागरूक राहणे आणि इतरांनाही जागरूक करणे, हे प्रत्येक ग्राहकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.