उंबर्डेवासीयांचे उपोषण स्थगित
31794
उंबर्डेवासीयांचे उपोषण तूर्त स्थगित
‘बीडीओं’कडून दखल; रस्ता खुला करण्याची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १८ : गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उंबर्डे ग्रामस्थांनी रस्ता खुला करून देण्यासाठी ग्रामपंचायत समोर सुरू केलेले उपोषण मंगळवारी सायंकाळी उशिरा स्थगित केले.
उंबर्डे ग्रामपंचायत क्षेत्रातील उंबर्डे-सुतारवाडी येथील मुख्य रस्ता ते वासुदेव पांचाळ यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खुला करावा, या मागणीकरिता गावातील ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. १६) सकाळपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांकडून हा रस्ता खुला करून त्याचे खडीकरण व डांबरीकरण व्हावे, यासाठी पाठपुरावा सुरू होता, परंतु ग्रामस्थांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे अखेर ग्रामस्थांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. जोपर्यंत रस्ता खुला करण्याबाबत प्रशासनाकडून लेखी आश्वासन दिले जात नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार, अशी भूमिका त्यांनी घेतली.
सायंकाळी गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या उपोषणाला भेट दिली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले. ‘पाणंद रस्ता’ सातबारा उताऱ्यात नोंद आहे. त्यामुळे तातडीने भूमिअभिलेख कार्यालयामार्फत मोजणी प्रक्रिया पूर्ण करून जर अतिक्रमण आढळल्यास संबंधितांना ७ दिवसांची मुदत देण्यात येईल. त्यानंतरही अतिक्रमण न काढल्यास ग्रामपंचायतीमार्फत आवश्यक पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येईल, असे लेखी पत्र देण्यात आले. आश्वासनांची अंमलबजावणी तातडीने न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

