सिंधुदुर्गाचे पोलिस दल मजबूत करणार

सिंधुदुर्गाचे पोलिस दल मजबूत करणार

Published on

swt1917.jpg
31991
सिंधुदुर्गनगरी ः पोलिस वाहन लोकार्पण सोहळ्याचे दीप प्रज्वलित करून उद्घाटन करताना पालकमंत्री नीतेश राणे. बाजूला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व इतर.

सिंधुदुर्गाचे पोलिस दल मजबूत करणार
नीतेश राणे ः पोलिसांसाठीच्या २८ वाहनांचे लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १९ ः सिंधुदुर्गात जिल्हा नियोजनमधून पोलिसांना २८ अत्याधुनिक वाहने दिली आहेत. यापुढेही जिल्ह्याचे पोलिस दल अधिक मजबूत केले जाईल. येथे येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित वाटेल, अशी मजबूत व्यवस्था साकारली जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री नीतेश राणे यांनी आज येथे केले.
पालकमंत्री राणे व गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते पोलिस दलासाठी २८ अत्याधुनिक वाहनांचे आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपाध्यक्ष दादा साईल, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. राणे म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे नागरिकांसोबतच पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित वाटावे, यासाठी पोलिसांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पोलिस दल हे समाजाच्या सुरक्षेचा मजबूत आधार आहे. त्यामुळे त्यांना आधुनिक साधने आणि सुविधा देणे ही शासनाची प्राथमिकता आहे. जिल्हा नियोजन निधीतून पोलिसांना २८ अत्याधुनिक वाहने देण्यात आली आहेत. या वाहनांमुळे गुन्हे रोखणे, तपास करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत देणे अधिक सोपे आणि जलद होणार आहे. यापुढेही पोलिस दल अधिक मजबूत करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाणार आहे.
ते पुढे म्हणाले, "जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिस दल सक्षमपणे करत आहे. नागरिकांबरोबरच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कायदा व सुव्यवस्था राहिली तर जिल्ह्यात गुंतवणूक व रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन कशा प्रकारे अधिक बळकट करता येईल, यासाठी पालकमंत्री म्हणून मी नेहमी प्रयत्नशील आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांना या वाहनांचा उपयोग होणार आहे. आपल्या जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सीसीटीव्ही देखील पोलिस दलाला उपलब्ध करून देण्यात येतील. ''नशामुक्त जिल्हा'' अशी आपल्या जिल्ह्याची ओळख निर्माण करून एक आदर्श जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला अग्रेसर ठेवायचे आहे.
जिल्ह्याच्या सुरक्षिततेबरोबरच नागरिकांशी संवाद साधण्यासाठी जिल्हा पोलिस दल अभिनव उपक्रम राबवित आहे. पोलिस नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले. यावेळी बोलताना डॉ. भोयर यांनीही मार्गदर्शन केले.
पोलिस अधीक्षक श्री. दहिकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना अडचणीच्यावेळी मदतीसाठी, वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच एखाद्या गंभीर गुन्हा घडल्यास गुन्ह्याच्या घटनास्थळी पोहोचून योग्य ते पुरावे जमा करणे, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने घटनेच्या ठिकाणी तत्काळ मनुष्य बळ पोहोचविणे, न्यायालयीन बंदी, कैदी यांना कारागृहातून न्यायालयात ने-आण करणे आदी आवश्यक बाबी विचारात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यास वाहनांची आवश्यकता होती. जिल्हा पोलिस दलासाठी वाहन खरेदीकरिता एकूण ३ कोटी ७४ लाख इतका निधी पालकमंत्री यांच्या पुढाकारातून उपलब्ध झाला. या निधीतून २८ वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दल अधिकाधिक समक्ष बनविणे तसेच डायल ११२ हा प्रकल्प अत्यंत प्रभावीपणे राबविणे, गुन्हेगारी रोखणे, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच सर्वसामान्य लोकांना आडचणींच्या वेळी या वाहनांची मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com