चिपळूण बाजारपेठेला हापूस आंब्या प्रतीक्षा
rat२०p२१.jpg-
३२१८६
चिपळूण ः बदलत्या हवामानामुळे तालुक्यातील मालदोली भागातील आंब्यावर आलेला प्रचंड मोहोर टिकू शकला नाही. (मुझफ्फर खान ः सकाळ छायाचित्रसेवा)
चिपळूण बाजारपेठेला हापूस आंब्याची प्रतीक्षा
हवामान बदलाचा उत्पादनावर परिणाम; गुढीपाडव्याचा मुहूर्त हुकला
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० : दरवर्षी गुढीपाडव्याला चिपळूण बाजारपेठेत हापूस आंबा विक्रीसाठी उपलब्ध होतो; मात्र यावर्षी अजूनही आंबा स्थानिक बाजारपेठेत दाखल झालेला नाही. यंदा आंब्याची चव खवय्यांना चाखायला मिळाली नाही. यावर्षी उत्पादन कमी असून, हापूस विलंबाने बाजारात येणार आहे.
हवामानातील बदलाचा परिणाम आंब्याच्या मोहोरावर झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी पडलेल्या थंडीमुळे मोहोर येणे व फळधारणा याचे वेळापत्रक कोलमडले. जानेवारी अखेरपर्यंत तालुक्यात केवळ मोहोर मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. त्यामुळे सर्वांनाच यंदा मोठ्या प्रमाणात उत्पादन येईल, अशी आशा होती; मात्र अचानक तापमान वाढल्याने मोहोरावर परिणाम झाला. चिपळूण तालुक्यात सुमारे ४ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड होत असून, उत्पादनक्षम क्षेत्र सुमारे साडेतीन हजार हेक्टर आहे. सध्या अनेक ठिकाणी केवळ १० ते १५ टक्केच आंबापिक हाती येईल, असा अंदाज आहे. त्यातच तुडतुडे व भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने काही भागांतील आंब्याचे नुकसान झाले आहे.
चिपळूण शहरात दरवर्षी भिले, बामणोली, कालुस्ते, मालदोली या खाड्यातील आंबा विक्रीसाठी येतो. गुढीपाडव्याला आंबा बाजारात दाखल झाल्यानंतर त्याचे दर जास्त असतात. तसेच ज्यांचे नातेवाईक परदेशात आहेत ते जास्त दर देऊन आंबा खरेदी करतात. गुहागरनाका, भेंडीनाका, शिवनदी परिसर तसेच खेडेकर क्रीडासंकुलच्या परिसरात घाऊक दरात आंब्याची विक्री होते; मात्र यावर्षी अजून आंबाविक्रेत्यांचे स्टॉल लागलेले दिसत नाहीत.
कोट
एक महिन्याचा अवधी लागणार
वर्षभर आंबाबागेची काळजी घेणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र हवामानातील बदलामुळे उत्पादनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ९० टक्के आंबापिकाचे नुकसान झाले आहे. उर्वरित पाच ते दहा टक्के असणाऱ्या आंबा व काजूपिकाला अचानक तापमान वाढल्याने फटका बसला आहे तर अवकाळी वादळी पावसाच्या भितीचेही बागायतदारांवर संकट घोंगावत आहे. मोहोर आल्यानंतर फळ पक्व होण्यासाठी साधारणतः ९० दिवस लागतात.
- जगदीश काते, शेतकरी चिपळूण
कोट
आंबा व काजू फळपिकाकडे कोकणातील बागायतदार याकडे नगदी पीक म्हणून पाहतो. या पिकावर त्याचे संपूर्ण कुटुंब अवलंबून असते. निसर्गाच्या अवकृपेने यंदा कोकणातील आंबा-काजू बागायतदार हवालदिल झाले आहेत. केलेल्या मशागती आणि फवारणीचाही खर्च निघणे कठीण आहे. बदलत्या हवामानामुळे यंदा उत्पादन केवळ १० टक्क्यांवर आले आहे. शेतकरी-बागायतदार पुरता मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून सरसकट किमान पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करावी.
- शौकत मुकादम, माजी सभापती, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

