रत्नागिरीत २ ते ४ अंशाने पारा चढणार
रत्नागिरीत २ ते ४ अंशाने पारा चढणार
हवामान विभाग ; आंबा बागायतदारांना सतर्कतेचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० ः रत्नागिरी जिल्ह्यात येत्या २१ ते २५ मार्चदरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी वर्तवला आहे. या काळात तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून, २२ मार्चला काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा त्रास जाणवू शकतो.
मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात कडाक्याचे ऊन जाणवत होते; मात्र दुसऱ्या पंधरवड्याच्या सुरवातीलाच वातावरणात बदल झाला आहे. पारा ३३ ते ३४ अंशावर स्थिरावला आहे. त्यामुळे धगधगते ऊन जाणवत नाही. सकाळच्या सत्रातही हवेत गारवा जाणवतो. ग्रामीण भागात धुकेही पाहायला मिळत आहे. मध्येच ढगाळ वातावरणही आहे; मात्र रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची नोंद झालेली नाही.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दहा दिवसात कोकणातील वातावरण पुन्हा बदलणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमानात २१ ते २४ मार्चदरम्यान २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. २५ मार्चला थोडी घट अपेक्षित आहे. कमाल तापमान ३३-३६ अंश से. दरम्यान राहील. किमान तापमानात २१ व २२ मार्चला विशेष बदल अपेक्षित नाही. त्यानंतर २३ ते २५ मार्चदरम्यान किमान तापमानात २ ते ३ अंशाने वाढ होईल. अंदाज कालावधीत २१ ते २४ अंश पारा राहील.
हवामान अंदाज्याच्या पार्श्वभूमीवर, कोकण कृषी विद्यापिठाने आंबा बागायतदारांना सूचना दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये आंबा काढणीस तयार आहे. उन्हामुळे हापूस आंबाफळात साका होण्याची भीती असते. साका कमी करण्यासाठी ‘नूतन’ झेल्याच्या सहाय्याने चौदा आणे (८० ते ८५ टक्के) पक्वतेची फळे अलगद देठासह काढावीत व सावलीत ठेवावीत. काढणी सकाळी १० वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी ४ नंतर करावी. काढलेल्या फळांचे तापमान वाढल्यास साका आढळतो म्हणून फळे उन्हात ठेवू नयेत, असे आवाहन केले आहे.
चौकट
झाडांना पाणी द्या
आंबापिकात फळधारणा झालेली असल्यास जेथे उपलब्ध व शक्य आहे तेथे प्रतिझाडास १५ दिवसांनी १५० ते २०० लिटर पाणी द्यावे. अशा प्रकारे ३ ते ४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात; मात्र फळे काढणीस तयार होण्याच्या एक महिना अगोदर झाडास पाणी देण्याचे बंद करावे म्हणजे फळांच्या गुणवत्तेवर आणि टिकाऊपणावर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही. तसेच दमट हवामानामुळे आंब्याच्या विकसित होणाऱ्या फळांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसे आढळल्यास कोकण कृषी विद्यापिठाने सुचवलेली औषध फवारावीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

