टॅंकरने पाणी ओतून केली विहिरीतील बिबट्याची सुटका

टॅंकरने पाणी ओतून केली विहिरीतील बिबट्याची सुटका

Published on

-rat22p24.jpg
32621
पावस ः कोळंबे येथील विहिरीत पडलेल्या ब्लॅक पॅंथरला ३२ तासांनी बाहेर काढण्यात यश आले.

-rat22p23.jpg
32614
ब्लॅक पॅंथरला पिंजऱ्यात जेरबंद करणारे वनविभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थ.


टॅंकरने पाणी ओतून केली
विहिरीतील बिबट्याची सुटका

कोळंबेतील थरार; ३२ तासांनी पिंजऱ्यात जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २२ : कोळंबे येथील आंबा बागेतील ५० फूट खोल विहिरीत पडलेल्या ब्लॅक पॅंथरची (बिबट्या) तब्बल ३२ तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाने अनोख्या पद्धतीने सुखरूप सुटका केली. विहिरीत टँकरने पाणी सोडून पाण्याची पातळी वाढवण्यात आली आणि त्यानंतर बिबट्या पिंजऱ्यात शिरल्याने अखेर त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
दिनेश भागवत यांच्या बागेतील विहिरीत २१ मार्चला सकाळी सातच्या सुमारास वासराचा पाठलाग करताना बिबट्या पडल्याची माहिती मिळताच पोलिसपाटील समीक्षा तोरसकर यांनी वनविभागाला कळवले. सकाळी नऊ वाजल्यापासून वनविभागाने बचावकार्य सुरू केले. दिवसभर प्रयत्न करूनही विहिरीत बसण्यासाठी सुरक्षित जागा मिळाल्याने बिबट्या पिंजऱ्याकडे येत नव्हता. विहिरीत सुमारे अडीच फूट पाणी असल्याने बिबट्या दगडाजवळ स्थिर बसला होता. त्यामुळे वनविभागाने विशेष उपाय म्हणून टँकरद्वारे आठ ते नऊ हजार लिटर पाणी विहिरीत सोडण्यात आले. त्यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने बिबट्याला बसण्याची जागा कमी झाली आणि सायंकाळी पाचच्या सुमारास तो पिंजऱ्यात शिरला. त्यानंतर पिंजऱ्याचे दार बंद करून ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात आले. कोणतीही दुखापत न होता त्याची सुटका करण्यात आली असून, वैद्यकीय तपासणीसाठी त्याला रत्नागिरी येथे पाठविण्यात आले आहे. हा बिबट्या नर असून, त्याचे वय साधारण ३ वर्षे आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला यामुळे पूर्णविराम मिळाला असून, ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान, ब्लँक पँथरला बाहेर काढण्यासाठीचे ऑपरेशन वन विभागाचे अधिकारी गिरिजा देसाई, अतिरिक्त वन अधिकारी प्रियांक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक वन अधिकारी प्रकाश सुतार, नानू गावडे, विराज संसारे, दिवा कोळेकर, विक्रम कुंभार, श्रावणी पवार, नमिता कांबळे, कोळंबेतील पोलिसपाटील यांनी केले.
------
चौकट
वन विभागाचा रात्रभर पहारा
विहिरीत टाकलेल्या पिंजऱ्यात ब्लॅंक पँथर येतो की नाही हे पाहण्यासाठी वन विभागाचे पथक रात्रभर जागता पहारा ठेवून होते. पिंजरा हलला तरी ते खात्री करत होते. विहिरीतील कपारीत बिबट्याला बसण्यासाठी सुरक्षित जागा असल्यामुळे तो बाहेर पडत नव्हता. पिंजऱ्यात येण्यासाठी त्याला खाद्याचे आमिषही दिले होते. परंतु रात्रभर तो पिंजऱ्यात आलाच नाही.
----------------
कोट
गेले ३२ तास वनविभाग आणि ग्रामस्थ या ब्लॅक पॅंथरच्या सुटकेसाठी प्रयत्नशील होते. या परिसरामध्ये गेले कित्येक महिने त्‍याचा वावर होता. त्यामुळे रात्री अपरात्री परिसरामध्ये फिरणे धोकादायक झाले होते. वनविभागाने अनेकवेळा या भागात गस्त घातली, परंतु त्यांना यश आले नव्हते. परंतु अखेर भक्षाच्या पाठलाग करताना ब्लॅक पॅंथर विहिरीमध्ये पडल्यामुळे वनविभाग आणि ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
- समीक्षा हातिसकर, पोलिसपाटील, कोळंबे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com