तुटलेल्या घसरगुंडीमुळे चिमुकली जखमी

तुटलेल्या घसरगुंडीमुळे चिमुकली जखमी
Published on

32757

तुटलेल्या घसरगुंडीमुळे चिमुकली जखमी

सावंतवाडीतील प्रकार; नगरपरिषद कारभाराविरुद्ध संताप

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ : नगरपरिषदेच्या जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानातील खेळण्यांच्या दुरवस्थेचा फटका एका निष्पाप चिमुकलीला बसला आहे. येथील तुटलेल्या घसरगुंडीचा पत्रा लागून ती गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा प्रकार काल (ता. २२) घडला.
ही चिमुकली आपल्या पालकांसोबत उद्यानात खेळण्यासाठी गेली होती. घसरगुंडीचा पत्रा तुटलेला असतानाही त्याची वेळेत दुरुस्ती केलेली नव्हती. खेळताना अचानक हा पत्रा लागल्याने चिमुकलीला गंभीर दुखापत झाली. ‘‘मुलांच्या सुरक्षेपेक्षा मुख्याधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना इतर कामे महत्त्वाची वाटली का,’’ असा संतप्त आरोप आता पालकांकडून होत आहे. शिव उद्यानात रोज शेकडो मुले आणि नागरिक येत असतात; मात्र नादुरुस्त खेळण्यांमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. उद्यानाच्या देखभालीसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जात असताना प्रत्यक्षात दुरुस्ती का झाली नाही? या अपघाताला जबाबदार कोण, असा प्रश्‍न सावंतवाडीकर विचारत आहेत.
................
लक्ष वेधूनही दुर्लक्ष
उद्यानातील खेळण्यांच्या सुरक्षिततेबाबत विरोधी गटाचे नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी यापूर्वीच प्रश्न उपस्थित केला होता. तसेच उद्यानात येणाऱ्या नागरिकांनीही प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती; मात्र प्रशासनाने या तक्रारींकडे पूर्णतः दुर्लक्ष केले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com