रत्नागिरी- डीजीके कॉलेजच्या विद्यार्थ्यांची
डीजीके कॉलेजच्या विद्यार्थ्यांची
गोव्यातील इस्टिम इंडस्ट्रीला क्षेत्रभेट
रत्नागिरी, ता. २३ : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर (डीजीके) वरिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विभागातर्फे गोव्यातील मापुसा येथे असलेल्या इस्टिम इंडस्ट्रिज प्रा. लि. या संस्थेच्या संशोधन व विकास प्रयोगशाळेला शैक्षणिक क्षेत्रभेट देण्यात आली.
कंपनीचे मानव संसाधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. विजय नाईक यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून कंपनीची स्थापना, तयार होणारी विविध रसायने तसेच उत्पादनांची गुणवत्ता कशी टिकवली जाते या विषयी सादरीकरणाच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. त्यानंतर संशोधन व विकास विभागातील वरिष्ठ उत्पादन रसायन शास्त्रज्ञ विशाल पाटील यांनी कंपनीत वापरल्या जाणाऱ्या विविध रासायनिक प्रक्रिया, तयार होणारी उत्पादने, वापरली जाणारी सुरक्षा व्यवस्था तसेच या क्षेत्रात कार्य करण्यासाठी आवश्यक कौशल्ये याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे समाधान केले.
कंपनीचे सहाय्यक महाव्यवस्थापक डॉ. म. स. धाईगुडे यांनी प्रयोगशाळेत वापरण्यात येणारी विविध उपकरणे, रासायनिक प्रक्रिया तसेच गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेबाबत माहिती देत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहणी घडवून आणली. कंपनीचे उपाध्यक्ष डॉ. रमेश मंत्री यांनी औद्योगिक क्षेत्रात करिअर करताना आवश्यक असलेला दृष्टिकोन स्पष्ट केला. क्षेत्रभेटीत रसायनशास्त्र विषयाच्या द्वितीय व तृतीय वर्षातील १३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

