विषय समित्यांचे सभापती आज ठरणार

विषय समित्यांचे सभापती आज ठरणार

Published on

विषय समित्यांचे सभापती आज ठरणार
निवडणूक कार्यक्रम : इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २४ : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, महिला व बालकल्याण, वित्त व बांधकाम आणि शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापतीपदांची निवड उद्या (ता. २५) होत आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत सावंतवाडी व कुडाळ तालुक्यांना स्थान मिळाले असल्याने, उर्वरित सहा तालुक्यांतील इच्छुकांनी सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
सुमारे चार वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर जिल्हा परिषदेत लोकनियुक्त प्रशासन सुरू झाले आहे. १६ मार्चला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपचे प्रमोद कामत अध्यक्षपदी, तर शिंदे शिवसेनेचे तुकाराम उर्फ दादा साईल उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले. त्यानंतर आता विषय समिती सभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या (ता. २५) या पदांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. यासाठी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत अर्ज दाखल केले जातील. दुपारी ३ वाजता सर्व जिल्हा परिषद सदस्यांची विशेष सभा बोलावण्यात आली असून, त्यावेळी निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजप २७, शिंदे शिवसेना १४, ठाकरे शिवसेना ३ आणि ६ अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना यांची युती असल्याने विषय समिती सभापतीपदी महायुतीचेच सदस्य विराजमान होणार, हे निश्चित आहे; मात्र, महायुतीचे वरिष्ठ नेते कोणाला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

चौकट
कोणाला आहे संधी ?
अध्यक्षपद सावंतवाडीला (भाजपचे प्रमोद कामत) आणि उपाध्यक्षपद कुडाळला (शिंदे शिवसेनेचे तुकाराम साईल) मिळाले आहे. त्यामुळे उर्वरित कणकवली, मालवण, देवगड, वेंगुर्ले, वैभववाडी आणि दोडामार्ग या तालुक्यांना सभापती निवडीत स्थान मिळण्याची शक्यता आहे. समाजकल्याण सभापती हे पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या प्रवर्गातून निवडून आलेले तीन सदस्य जिल्हा परिषदेत आहेत (२ शिंदे शिवसेना, १ भाजप). जर हे पद शिंदे शिवसेनेला मिळाले, तर त्यांच्या दोनपैकी एकाची वर्णी लागेल; अन्यथा भाजपच्या एकमेव सदस्याला संधी मिळू शकते. महिला व बालविकास, वित्त व बांधकाम, आणि शिक्षण व आरोग्य समिती कोणाकडे जाणार, यावर उमेदवारांची नावे अवलंबून आहेत. कणकवली, मालवण आणि देवगड या मोठ्या तालुक्यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. तसे झाल्यास कणकवली आणि देवगडमध्ये भाजपला, तर मालवणमध्ये शिंदे शिवसेनेला संधी मिळू शकते. उर्वरित एका पदासाठी वेंगुर्ले, दोडामार्ग किंवा वैभववाडीचा विचार होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com