चिमण्यांचा चिवचिवाट हरवतोय....!
चिमण्यांचा चिवचिवाट हरवतोय....!
जिल्ह्यातील वाढती वृक्षतोड ; शहरीकरणाचा निसर्गावर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २४ ः ग्रामीण भागात एकेकाळी पहाटेच्या प्रहरी चिमण्यांचा चिवचिवाट आणि विविध पक्ष्यांची किलबिल ऐकू आली की, शेतकऱ्यांच्या दिवसाची सुरुवात होत असे. पक्ष्यांचा हा आवाज शेतकऱ्यांसाठी एक ‘नैसर्गिक अलार्म’ होता; मात्र, काळाच्या ओघात निसर्गाचा हे गोड संगीत आता हळूहळू लोप पावत चालले असून, अंगणातील चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
पूर्वी ग्रामीण भागात पाचरटाची छप्परे, कौलारू घरे आणि झोपड्यांचे प्रमाण अधिक होते. घराभोवती असलेल्या बोरबाभळीच्या झाडांमुळे पक्ष्यांना सुरक्षित अधिवास मिळत असे. विशेषतः मानवी वस्तीत राहणारा चिमणी हा पक्षी घराच्या कोपऱ्यात किंवा छताच्या वळचणीला सहज घरटे बांधत असे; मात्र, आधुनिकीकरणामुळे आता ग्रामीण भागातही सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. कौलारू घरांची जागा काँक्रिटच्या स्लॅबने घेतल्याने पक्ष्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
पक्ष्यांच्या हालचालींवरून शेतकरी पूर्वी पावसाचा किंवा हवामानाचा अचूक अंदाज बांधत असत. वाढते शहरीकरण, वृक्षतोड आणि शेतीखालील क्षेत्रात झालेली घट यामुळे पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले आहेत. जंगलातील मानवी हस्तक्षेप, अन्नाची कमतरता आणि वाढते प्रदूषण ही यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.
पक्ष्यांची घटती संख्या आता केवळ पर्यावरणापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तिचे पडसाद सामाजिक परंपरांवरही उमटत आहेत. दशक्रिया विधीच्यावेळी आवश्यक असलेल्या कावळ्यांची संख्या घटल्याने अनेक ठिकाणी तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
-----
संवर्धनाची गरज
पक्षी हे निसर्गतः ‘कीटकभक्षी’ असल्याने शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. निसर्गाची अन्नसाखळी आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यात त्यांची भूमिका मोलाची आहे. एकीकडे परदेशी पाहुण्या पक्ष्यांचे (स्थलांतरित पक्षी) आकर्षण वाढत असताना आपल्या स्थानिक पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होणे ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे आता केवळ हळहळ व्यक्त न करता कृत्रिम घरटी लावणे, वृक्षारोपण करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अवलंबणे ही काळाची गरज बनली आहे.
-----
कोट
वाढत्या शहरीकरणामुळे आणि नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्यामुळे चिमण्यांची संख्या घटली आहे. तसेच जुन्या लाकडी घरांची पद्धत बंद होऊन काँक्रिट घरांमध्ये घरटी बनवण्यासाठी जागा नसल्याने प्रजननावर परिणाम होत आहे. यासाठी कृत्रिम घरटीसारखे उपाय राबवणे गरजेचे आहे. तसेच अधिवास सुरक्षित राहावा म्हणून देशी वृक्ष लागवड करणे महत्त्वाचे आहे.
- प्रतीक मोरे, पक्षीमित्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

