रत्नागिरी कचरा प्रकल्प
( ग्राऊंड रिपोर्ट मेन)
rat२४p१६.jpg-
P२६O३२९२७
रत्नागिरी ः कोकणनगर येथे कचरा जाळल्यामुळे परिसरात पसरलेला धूर लाईटच्या उजेडात स्पष्ट दिसत आहे. यामुळे नागरिक हैराण आहेत.
rat२४p१७.jpg-
P२६O३२९२८
कचराडेपोमध्ये साचलेले प्लास्टिक
rat२४p१८.jpg-
P२६O३२९२९
कचऱ्यावर प्रक्रिया करणारी मशिन अनेक महिने बंद अवस्थेत आहे.
rat२४p१९.jpg-
२६O३२९३०
धुमसत असलेला साळवी स्टॉप येथील कचराडेपो.
----
रत्नागिरी शहर धुरात गुदमरतय...
पालिकेचे दुर्लक्ष ; १ लाख ४० हजार क्युबिक मीटर कचऱ्याचे संकलन, दुर्गंधीने आरोग्य धोक्यात
स्वच्छतेचे पुरस्कार मिळवणारे शहर धुरात गुदमरतय
रत्नागिरी पालिकेचे प्रश्नाकडे दुर्लक्ष; १.४० लाख क्युबिक मीटर कचरा डंप, धुर, दुर्गंधीने आरोग्य धोक्यात
शहराच्या प्रवेशद्वारावरील साळवी स्टॉप येथे अनेक वर्षांपासून असलेले डंपिंग ग्राउंड आता शहरासाठी शाप बनलेले आहे. येथील वर्षानुवर्षे रखडलेला घनचकरा प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागला असून, शासनाने सुमारे तीन कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी चंपक मैदान येथे पाच एकर जागा एमआयडीसीच्या माध्यमातून प्रकल्पासाठी दिली आहे. ती पालिकेकडे वर्गही झाली आहे; परंतु नवीन जागेत कचरा टाकण्यास अद्यापही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे डंपिंग ग्राउंडमधील कचऱ्याला वारंवार लागणारी आग आणि त्यातून निर्माण होणारा धूर, दुर्गंधीने परिसरातील साळवी स्टॉप, कोकणनगर भागातील नागरिकांचा श्वास गुदमरतोय. डोळे चुरचुरणे, श्वसनाचे आजार याने या परिसरातील हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. स्मार्टसिटीकडे वाटचाल करणाऱ्या रत्नागिरी शहराचे प्रवेशद्वार वर्षानुवर्षे साठून राहिलेल्या सुमारे १ लाख ४० हजार क्युबिक मिटर प्रदूषणकारी कचऱ्याच्या त्रासातून कधी सुटणार, याकडेच सर्वांचे डोळे लागले आहेत.
- राजेश शेळके, रत्नागिरी
----
रत्नागिरी पालिकेने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, स्वच्छ भारत अभियानात आदींमध्ये स्वच्छतेमधील अव्वल पुरस्कार मिळवले आहेत; परंतु प्रत्यक्षात कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प पालिकेला दोन दशकामध्ये उभारता आलेला नाही. जागेच्या प्रश्नाअभावी हा प्रकल्प रखडला होता. दांडेआडोम येथे जागा मिळाली; पण तेथील प्रकल्प रद्द करण्यात आला. त्यामुळे शहरात दरदिवशी निर्माण होणारा २२ टन कचरा टाकायचा कुठे? हा प्रश्नच होता. पर्याय म्हणून साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राउंडचा उपयोग सुरू झाला. वर्षानुवर्षे तिथेच कचरा टाकला जात आहे. गेल्या तीन दशकात सुमारे १ लाख ४० हजार क्युबिक मीटर कचरा साठल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्या कचऱ्याला वारंवार आग लागते. ही आग तिथे फिरणारे भंगार व्यावसायिक लावतात किंवा विशिष्ट वायू तयार होऊन ती आग लागते, असे दोन अंदाज वर्तवले जात आहेत; मात्र वारंवार लागणाऱ्या या आगीने साळवी स्टॉपसह आजूबाजूच्या लोकवस्तीमधील नागरिक हैराण झाले आहेत. रत्नागिरी शहर साळवी स्टॉपच्या पुढे जे. के. फाईल्सच्या दिशेने वाढत आहे. तेथील नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
----
*घनकचऱ्यावरील प्रक्रियेचा प्रयोग
साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राउंडवरील घनकचऱ्यावर प्रक्रियेचा मार्ग पालिकेने अवलंबलेला आहे. येथे साचलेल्या घनकचऱ्यावर बायोमायनिंग मशिनद्वारे प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी माजी आरोग्य सभापती निमेश नायर यांनी प्रायोगिक तत्त्वावर राबवलेल्या प्रकल्पात पहिल्या टप्यात ४ हजार क्युबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया केली होती. त्यासाठी २८ लाख रुपये खर्च आला. आता उर्वरित कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ४४ लाखांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. हा प्रत्यक्षात आला तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न जागा ताब्यात मिळेपर्यंत नियंत्रणात येईल.
*हक्काच्या सात एकरवर सोडले पाणी
अनेक वर्षे लढा देऊन दांडेआडोम येथील सुमारे ६ ते ७ एकर जागेचा विषय न्यायालयात पालिकेच्या बाजूने लागला. त्यामुळे या जागेवर पालिकेचा हक्काचा अत्याधुनिक प्रकल्प होणार हे निश्चित होते; मात्र राजकीय घडामोडींमुळे हा प्रकल्प रद्द करण्यात आला. त्याचा फटका रत्नागिरीवासियांना सहन करावा लागत आहेत. हक्काची जागा सोडून पालिका एमआयडीसीतील जागेच्या मागे लागली आहे.
*‘त्या’ कचऱ्याचे करायचे काय?
चार वर्षांपूर्वी तत्कालीन आरोग्य सभापतींनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात २८ लाखांचा प्रस्ताव पाठवून डंपिंग ग्राउंडवर वर्षानुवर्षे साचलेल्या घनकचऱ्यावर प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या टप्प्यात ४ हजार क्युबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया सुरू आहे. बायोमायनिंग मशिनद्वारे त्याचे खत तयार करण्यात आले आहे. पालिकेने या खताची विक्री चालू केली; परंतु त्यानंतर कार्यकारिणीचा कालावधी संपुष्टात आला आणि पालिकेवर प्रशासकीय राजवट आली. तेव्हापासून आजपर्यंत कचऱ्याची विल्हेवाट लवण्यासाठी प्रयत्नच झाले नाहीत. उलट दरदिवशी २२ टन कचरा डंपिंग ग्राउंडवर टाकणे सुरूच आहे. त्यामुळे आता १ लाख ४० हजार क्युबिक मीटर घनकचऱ्याचे करायचे काय? असा प्रश्न पडलेला आहे. परिणामी, साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राउंड नागरिकांसाठी शाप ठरू लागले आहे.
*...अशी लागते वारंवार आग
एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा साचल्यामुळे कचऱ्यात वेगळ्या प्रकारचा गॅस तयार होतो. वाढत्या उष्म्यामुळे त्याला ठराविक तापमानानंतर अचानक आग लागते आणि कचरा पेटतो, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरे कारण म्हणजे कचऱ्यातील भंगार काढण्यासाठी काही भंगार व्यावसायिक किंवा मुले कचऱ्याला आग लावतात, अशी कारणे समोर आली आहेत. खरं काय ते माहिती नाही; परंतु वारंवार लागणाऱ्या आगीमुळे साळवी स्टॉप परिसरातील नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे.
*धुरामुळे आरोग्य धोक्यात
रात्री उशिरा आग लागल्यामुळे किंवा लावल्यामुळे रात्रभर हा धूर त्या परिसरामध्ये पसरतो. अक्षरशः धुराची चादर या परिसरावर पसरते. त्यामुळे नागरिकांना तीव्र उग्र वास येतो आणि श्वसनालाही त्रास होतो. काही वेळा एवढा धूर असतो की, वाहने चालवणे कठीण होते. अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर सकाळच्या धुराचे व्हिडिओ शेअर केले आहेत. सकाळी स्वच्छ हवा घेण्यासाठी नागरिक मॉर्निंग वॉकला निघतात; परंतु या परिसरात स्वच्छ नाही तर प्रदूषित हवा नागरिकांना खावी लागत आहे. त्यामळे त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
*प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस
साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राउंडमधील कचऱ्याला आग लागल्याने वारंवार तिथे वायुप्रदूषण होत आहे. हे प्रदूषण थांबवण्यासाठी पालिकेने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशा अनेकवेळा नोटिसा दिल्या आहेत. तरी त्यावर पालिकेने समाधानकारक उत्तर किंवा कृती केलेली नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून पालिकेवर दंडात्मक कारवाईदेखील केली आहे; मात्र एवढे होऊन देखील त्यामध्ये सुधारणा झालेली नाही. आजही कचरा जळतोय, धूर होतोय, प्रदूषण होतेय, नागरिकांना त्रास होतोय.
*घनकचरा प्रकल्पासाठी प्रतीक्षाच
गेली अनेक वर्षे रखडलेला रत्नागिरी पालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांनी एमआयडीसीमध्ये पाच एकर जागा मिळाली आहे. शहराजवळील चंपक मैदानात ही जागा आहे. ही जागा आता पालिकेकडे वर्ग झाली असली तरीही प्रत्यक्षात त्यावर कार्यवाही करण्यासाठी पुढील काही महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे अजून काही दिवस तरी साळवी स्टॉपवासियांना धुराची समस्या आणि दुर्गंधीला सामोरे जावे लागणार आहे.
कोट
आम्ही आताच पदभार स्वीकारला आहे. साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राउंडमधील साचलेल्या घनकचऱ्याबाबत अनेक तक्रारी आहेत. आम्ही त्यावर मार्ग काढत आहोत. तेथील कचरा आता खाणीमध्ये टाकला जात आहे तसेच कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा लवकरच कार्यान्वित केली जाईल. त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी चंपक मैदानात जागा दिली आहे. प्रकल्पही मंजूर झाला आहे. लवकरच ही समस्या निकाली निघेल.
- बाब नागवेकर, आरोग्य सभापती, रत्नागिरी पालिका
---
कोट
डंपिंग ग्राउंडच्या समस्येबाबत वारंवार बोलूनही आदी प्रशासन आता सत्ताधाऱ्यांवर काही फरक पडत नाही. तात्पुरते काहीतरी उपाय केले जातत आणि पुन्हा धुराचा प्रश्न कायम राहतो. आता तर धूर दिसू नये म्हणून त्या भागातील लाईट घालवण्याचा प्रकार पुढे आला आहे, हे गंभीर आहे. याबाबत आम्ही सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार आहोत. तत्काळ त्यावर उपाय काढला नाही तर आम्ही पालिकेवर मोर्चा काढू.
- प्रशांत साळुंखे, रत्नागिरी शहरप्रमुख, (ठाकरेगट)

