

डिझेल महाग, मासेमारी तोट्यात
दरफरकामुळे सहकारी संस्थांचे नुकसान; बंदरावरच थेट विक्रीची भीती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः पेट्रोलियम कंपन्यांकडून मिळणाऱ्या डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे मत्स्य व्यवसाय अडचणीत आला आहे. जिल्ह्यातील मच्छीमार सहकारी संस्थांना मिळणारे डिझेल ११७ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले असताना, खुल्या बाजारात पेट्रोलपंपांवर हाच दर ९२ रुपये आहे. दरात २५ रुपयांची तफावत असल्यामुळे संस्थांकडून डिझेल घेण्यास मच्छीमार तयार नाहीत. परिणामी, जिल्ह्यातील ३६ डिझेल पुरवठा करणाऱ्या संस्था अडचणीत आल्या आहेत. त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे, अशी माहिती महाराष्ट्र मच्छीमार विकाससंघाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल खान यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ८५ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था असून, सुमारे ४१ हजार सभासद आहेत. या संस्थांपैकी जिल्ह्यामध्ये ३६ संस्थांकडून सदस्य मच्छीमार नौकांना डिझेल पुरवले जाते. हा डिझेल पुरवठा इंडियन ऑईल कॉ. लि., हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम कंपन्यांकडून केला जातो. या सहकारी संस्था मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करतात. या डिझेलचा पूर्वीचा दर ८७ रु. ४७ पैसे प्रतिलिटर होता तो आता ११७ रु. प्रतिलिटर झाला आहे. यंदाचा मासेमारी हंगाम तोट्यात आहे. त्यात आता वाढलेल्या दराने डिझेल संस्थांकडून खरेदी होणार नाही. पर्यायाने आधीच अडचणीत असलेल्या संस्थांसह मच्छीमारांचे आर्थिक गणित कोलमडून जाणार आहे.
काही महिन्यांपूर्वी पेट्रोल पंपचालकांचे टँकर मिरकरवाडा बंदरात येऊन डिझेल विकत होते. या संदर्भात पोलिसांसह पुरवठा विभागाकडे तक्रारी करण्यात आल्यानंतर ही बेकायदेशीर डिझेल विक्री बंद झाली होती. आता पुन्हा पेट्रोलपंप चालकांचे टँकर बंदरात येऊन डिझेल विक्री करण्याची भीती आहे. त्यामुळे सहकारी संस्था आणखी अडचणीत येणार असल्याचे अब्दुल खान यांनी सांगितले. मच्छीमार सहकारी संस्थांना पूर्वीच्या दरानेच डिझेल मिळण्यासाठी मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे यांनाही निवेदन देण्यात आले असून, या निवेदनामध्ये इतरही अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.