

नांदगावात प्रभू श्री रामचंद्रांचा जयघोष
रामनवमी उत्साहात ः डबलबारी भजन सामन्याला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २७ ः ''दशरथ राजाला पुत्र हो झाला, कौसल्या मातेने झोका हा दिला'' अशा पारंपरिक पाळणा गीतांनी येथील श्री राम मंदिर येथे रामभक्तीचा सुवर्ण महोत्सवी रामजन्मोत्सव उत्साहात पार पडला. यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात झाले.
यानिमित्त बुधवारी (ता. २५) सकाळी षोड्शोपचार पूजा, रामनाम लेखन स्पर्धा, पाककला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. चित्रकला स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी महिलांच्या सुश्राव्य भजनाने वातावरण भक्तिमय झाले. दुपारी असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी महिलांसाठी ''होम मिनिस्टर'' कार्यक्रम रंगतदार झाला. रात्री डबलबारी भजनाच्या सामन्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गुरुवारी (ता. २६) पहाटेपासूनच मंदिर परिसर गजबजून गेला. सकाळी मंगल पूजाविधी आटोपल्यावर सुश्राव्य कीर्तनात भक्त तल्लीन झाले. दुपारी प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात महिलांनी सादर केलेल्या पारंपरिक गीतानी नांदगाव परिसर दणाणून गेला. यानंतर महाप्रसादाचा भक्तांनी आस्वाद घेतला. सायंकाळी दिंडीभजन व वेशभूषा स्पर्धांनी कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. भव्य पालखी मिरवणूक सोहळ्यात प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने आसमंत दणाणून सोडला. रात्री अमृतनाथ सिध्देश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचा दशावतारी नाट्यप्रयोग उत्स्फूर्त प्रतिसादात झाला. सर्व उपस्थित रामभक्तांचे श्रीराम मंदिर सेवा समितीतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
.................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.