

33750
यंदा कोकमही संकटात
अत्यल्प उत्पादन : शेकडो प्रक्रिया उद्योगासमोर अडचणींचा डोंगर
संतोष कुळकर्णी ः सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २७ : जिल्ह्यात विविध कारणांनी अडचणीत सापडलेल्या आंबा आणि काजू पिकांनंतर आता कोकम पिकावरही अरिष्ट ओढवण्याची चिन्हे आहेत. हे पीकही यंदा अत्यल्प येण्याची प्राथमिक स्थिती दिसत आहे. साहजीकच यावर आधारित शेकडो प्रक्रिया उद्योग अडचणीत आहेत. उत्पादन घटल्यास कोकणच्या खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक मानले जाणारे आगळ आणि कोकम यांचे दर यंदा वधारण्याची शक्यता आहे.
निसर्गाच्या अवकृपेमुळे कोकणातील महत्त्वाची उत्पादने ‘बॅकफूट’वर गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. बदलते हवामान आणि अनियंत्रित कीडरोगामुळे यंदा कोकणचा राजा ‘हापूस’ आणि काजू पिकावर संकट आले. जिल्हाभरातील बागायतदारांच्या मते, एकूण उत्पादनाच्या केवळ १० टक्केच उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे. हे संकट केवळ आंबा-काजू पुरते मर्यादित न राहता कोकम, सुपारी आणि नारळ उत्पादनांवरही पसरले आहे. कोकणची सद्यस्थिती समाधानकारक नसल्याने कोकम आणि आगळ निर्मितीवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. कोकणी जेवणात, विशेषतः सोलकढी आणि मत्स्याहारासाठी कोकमला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रामुख्याने सह्याद्री पट्ट्यातील गावांमध्ये कोकमची मोठी उलाढाल होते; मात्र उत्पादनातील घसरणीमुळे गृहिणींचे आर्थिक गणित बिघडण्याची चिन्हे आहेत.
गेल्या वर्षी मेमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या रतांब्याचे अतोनात नुकसान झाले होते. पावसामुळे रतांबे वाळवणे कठीण झाले, परिणामी बाजारपेठेत टंचाई निर्माण होऊन दर वाढले होते. कोकमचे व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे उत्पादन साधारण मेच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होते. २५ मेपर्यंत मिळणारे उत्पादन व्यावसायिक दृष्ट्या उपयोगी ठरते. कारण याची नीट काढणी करून ते सुकवता येते. या काळात उत्पादन मिळण्यासाठी आतापासूनच झाडावर फलधारणा सुरू व्हायला लागते. सद्यस्थितीत झाडावर झालेली फलधारणा फारच अल्प आहे.
पुढच्या टप्प्यात फलधारणा झाली तरी ती भर पावसात पक्व होणार आहे. त्याचा फारसा उपयोग होत नाही. एकूणच यंदा या पिकाची स्थिती खूपच चिंताजनक आहे. गेल्या काही वर्षांत कोकणात कोकमवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची संख्या वाढली आहे. यावर आधारित कुटुंबांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. हे पीकच नसेल तर हा प्रक्रिया उद्योग यंदा खूप मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. कोकमची उत्पादने गोवा आणि पूर्ण महाराष्ट्रात वितरित होतात. या पिकाचा निर्यातीसाठी ही उपयोग होतो. अत्यल्प उत्पादनामुळे यावर आधारित अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत येणार आहेत.
कोकम हा कोकणी खाद्यपदार्थांमधील चव वाढवणारा मुख्य घटक आहे. अधूनमधून अवकाळी पावसाचे सावट असल्याने रतांबा पीक आणखी धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.
........................
चौकट
कोकणी मेव्याला ''ग्रहण''
किनारी भागात आंबा-काजू, तर सह्याद्री भागात रतांबा आणि जांभूळ ही नगदी पिके घेतली जातात; मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा संपूर्ण ''कोकणी मेवा'' संकटात सापडला आहे.
........................
चौकट
कोकणची व्याप्ती
कोकम प्रक्रिया उद्योग प्रामुख्याने महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे केंद्रित आहे. या भागातील कोकमाला ''जीआय टॅग'' मिळाला आहे. एका अंदाजानुसार महाराष्ट्रात सुमारे ४६,६०० पेक्षा जास्त कोकम झाडे आहेत. कोकण पट्ट्यात वार्षिक सुमारे १०,४०० टनांपेक्षा जास्त उत्पादन होते.
........................
दृष्टिक्षेपात
* कोकम प्रक्रिया उत्पादने आणि बाजारपेठ
कोकमवर प्रक्रिया करून अनेक मूल्यवर्धित उत्पादने तयार केली जातात, ज्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. अमेरिका, ओमान, सौदी अरेबिया आणि यूएई येथे प्रामुख्याने कोकमची निर्यात होते.
* ''आयुष'' मंत्रालयाने कोकमाला १४० महत्त्वाच्या औषधी वनस्पतींच्या यादीत समाविष्ट केले आहे. तसेच सेंद्रिय उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे कोकम उद्योगाला मोठी संधी आहे.
.......................
कोट
यंदा आंबा आणि काजू उत्पादनात घट झालेली असतानाच रतांबा उत्पादन देखील कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगळ, कोकम यांच्या किंमती वधारण्याचे संकेत आहेत. रतांबा हा कच्चा माल असल्याने त्यापासून तयार होणाऱ्या सरबते, आगळ, कोकम आदी प्रक्रिया उत्पादनालाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. गतवर्षी देखील रतांबा पीक अडचणीत आले होते तर यंदाही उत्पादन घटीची लक्षणे आहेत. इतकेच काय तर यंदा करवंद उत्पादन देखील कमी दिसत आहे.
- श्रीधर ओगले, प्रक्रिया उद्योजक, दहिबांव (देवगड)
..................................
कोट
जिल्ह्याच्या विविध भागात यावर्षी रतांबा उत्पादन कमी दिसत आहे. एकूणच रतांबा पीक कमी येण्याची सध्याची स्थिती आहे. त्यामुळे कोकम महागल्यास गृहिणींना अडचणीचे ठरू शकते. आंबा, काजू याबरोबरच रतांबा उत्पादन घटल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडू शकते. एकूणच शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही समाधानाची बाब नाही.
- मंगेश राणे, शेतकरी, तोरसोळे (देवगड)
............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.