भैरी देवस्थानतर्फे आज हिंदू संमेलन

भैरी देवस्थानतर्फे आज हिंदू संमेलन
Published on

भैरी देवस्थानतर्फे
आज हिंदू संमेलन
रत्नागिरी : हिंदू समाजामध्ये एकता, जागरुकता आणि धर्माभिमान वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ग्रामदैवत श्रीदेव भैरी देवस्थानतर्फे हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ललकार हिंदू एकजुटीची! या घोषवाक्याखाली होणारे हे संमेलन शनिवारी (ता. २८) सायंकाळी ४.३० ते ६.३० या खालची आळी परिसरातील भैरव मंगल कार्यालयात होणार आहे. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सध्याच्या सामाजिक परिस्थितीत धर्म, संस्कृती आणि परंपरांवर होत असलेल्या विविध आघातांच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाने एकत्र येण्याची गरज अधोरेखित करण्यात येणार आहे. संमेलनात हिंदू समाजातील समस्या, त्यावरील उपाययोजना, तसेच धर्मांतर आणि सामाजिक प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. समरसता श्लोक व एकात्मतेचा संदेश देणारे विचारही यावेळी मांडले जाणार आहेत. या संमेलनाचे आयोजन श्रीदेव भैरी हिंदू संमेलन समितीतर्फे करण्यात आले आहे. अध्यक्ष म्हणून रवींद्र ऊर्फ मुन्नाशेठ सुर्वे, तर उपाध्यक्ष म्हणून साईनाथ ऊर्फ बंधू नागवेकर कार्यरत आहेत. हिंदू समाजाने प्रत्यक्ष कृतीतून एकजूट दाखवावी, या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांनी सर्व हिंदू बांधवांनी कुटुंबासह उपस्थित राहून संमेलन यशस्वी करावे, असे आवाहन केले आहे.

आज दिव्यांग
उद्योजकता प्रशिक्षण
दापोली ः दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने दापोली पंचायत समितीतर्फे एकदिवसीय दिव्यांग उद्योजकता व कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवारी (ता. २८) सकाळी १०.१५ ते ५ या वेळेत दापोली येथील राधाकृष्ण मंदिर येथे होणार आहे. याचे उद्‍घाटन राज्यमंत्री योगेश कदम, जिल्हा परिषद रत्नागिरीच्या अध्यक्षा अस्मिता अनंत केंद्रे यांच्या हस्ते होणार आहे.

दापोलीत ८ एप्रिलला
एकदिवसीय कार्यशाळा
दापोली ः शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे प्रोत्साहन देण्यासाठी व पर्यावरणपूरक कृषी पद्धतींचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दापोली येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत ८ एप्रिलला एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे. सकाळी ९ ते ५.३० या वेळेत सर विश्वैश्वरैय्या सभागृहात कार्यशाळा होईल. कार्यशाळेला अप्पर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळा देशी गोवंशाचे पालन करणारे शेतकरी, कोकण कपिला (कोकण गिड्डा) संवर्धक, सेंद्रिय व नैसर्गिक शेती करणारे तसेच नव्याने शेती व्यवसायात उतरू इच्छिणारे शेतकरी यांच्यासाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. तसेच कृषी सखी, जैविक संसाधन केंद्रचालक, प्रगतशील व पुरस्कारप्राप्त शेतकरी, तरुण शेतकरी आणि महिला कृषी उद्योजक यांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रामनवमी उत्सवास
भाविकांची गर्दी
चिपळूण ः शहरातील गोवळकोट भोईवाडीमधील श्री साईमंदिराचा वर्धापनदिन आणि रामनवमी उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या निमित्त साईमंदिरात अभिषेक, पोथीवाचन, आरती व साईभंडारा झाला. सायंकाळी हरिपाठ आणि कीर्तनाला भाविकांनी गर्दी केली होती. रामनवमीनिमित्त रामरक्षेचे गायन करण्यात आले. सायंकाळी महाआरतीला भाविकांनी गर्दी केली होती. ओम बजरंग बली नवतरुण मंडळ गोवळकोट ग्रामस्थ आणि महिला मंडळाच्यावतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com