

33964
काजू उत्पादकांची एकी आवश्यक
विलास सावंत : काजूगर निर्यातीत निम्म्याने घट
बांदा, ता २८ : काजू उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस परत आणायचे असतील, तर त्यांनी एकत्र येऊन सखोल चर्चा व विचारविनिमय करणे आवश्यक आहे. जागतिक तसेच देशांतर्गत बाजारपेठ काबीज करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत सिंधुदुर्ग फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी व्यक्त केले.
मागील १५ वर्षांत काजूगर निर्यातीत तब्बल ५० टक्क्यांनी घट झाल्याने हा विषय अधिक गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, २०११-१२ मध्ये भारतातून सुमारे १.३१ लाख टन काजूगर निर्यात होत होती. मात्र, ‘नट्स अँड ड्रायफ्रूट्स कौन्सिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष गुंजन जैन यांच्या मते, ही निर्यात घटून सध्या केवळ ४५ हजार टनांवर आली आहे. या घसरणीमागे भारतीय काजूचा घसरणारा दर्जा हे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. यामुळे एक दुष्टचक्र निर्माण झाले आहे. देशांतर्गत उत्पादन कमी आणि परदेशातील मागणी अधिक असल्याने प्रक्रिया उद्योगांना परदेशातून निकृष्ट दर्जाचा कच्चा काजू आयात करावा लागतो. त्याचे स्थानिक काजूसोबत मिश्रण केल्याने एकूण गुणवत्तेवर परिणाम होतो. परिणामी, परदेशातील चोखंदळ ग्राहक भारताऐवजी इतर देशांकडून काजू खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. या पार्श्वभूमीवर काही उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे. काजू बोर्डामध्ये तज्ज्ञ शेतकरी संचालक आणि अनुभवी रोपवाटिका (नर्सरी) धारकांना स्थान देणे आवश्यक आहे.
------
आयात काजूवर शुल्क आकारा!
श्री. सावंत म्हणाले, ‘‘आयात काजूवर किमान २० टक्के शुल्क आकारण्याची गरज आहे. बेनिन देशाने आयात शुल्क ३० टक्क्यांपर्यंत वाढवून आपल्या देशांतर्गत उद्योगांचे संरक्षण केल्याचे उदाहरण समोर आहे. परदेश दौऱ्यांमध्ये या विषयातील शेतकरी प्रतिनिधींना शासनाच्या खर्चाने सहभागी करून घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील काजू उद्योगावर आलेले संकट दूर करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी, विशेषतः आमदारांनी या विषयावर गांभीर्याने चर्चा करून ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.