मालवणच्या विकासासाठी कटिबद्ध

मालवणच्या विकासासाठी कटिबद्ध
Published on

33893


मालवणच्या विकासासाठी कटिबद्ध

नीलेश राणे : सुमारे १०० कोटींच्या विकासकामांचा आढावा

मालवण, ता.२८ :‘स्वच्छ व सुंदर मालवण शहर’ या संकल्पनेतून शहरासाठी जे जे शक्य आहे, ते सर्व केले जाईल. राज्य सरकार, अर्थसंकल्प आणि नगरविकास खात्याच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करण्यात यश आले आहे. नगरविकास मंत्र्यांच्या माध्यमातून आणखी निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे आमदार नीलेश राणे यांनी सांगितले.
येथील पालिकेत शुक्रवारी आमदार राणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी शासनाकडून मंजूर सुमारे १०० कोटींच्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शहरासाठी लवकरच अतिरिक्त २५ ते ३० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी नगरपरिषद परिसराची पाहणी करून नवीन ‘सक्शन वाहनाचे’ लोकार्पण केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, स्वच्छता सभापती पूनम चव्हाण, महिला व बाल कल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, महेश कोयंडे, शर्वरी पाटकर, मेघा सावंत, नीना मुंबरकर, भाग्यश्री मयेकर, महानंदा खानोलकर, दर्शना कासवकर, ललित चव्हाण, तसेच पदाधिकारी मंदार लुडबे, संग्राम साळसकर, राजू बिडये, बबन शिंदे, मोहन वराडकर, परशुराम पाटकर, शेखर गाड, जॉन नऱ्होना, निषय पालेकर, दया देसाई, सुशील शेडगे आदी उपस्थित होते.
रस्ते, गटारे, मामा वरेरकर नाट्यगृह सुशोभीकरण, घनकचरा व्यवस्थापन, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, रॉक गार्डन, ‘नमो उद्यान’ आणि मत्स्यालय या कामांचा आढावा घेण्यात आला. जमिनी नावावर नसल्याने निधी खर्चात येणाऱ्या अडचणींवर शासनस्तरावर चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. पालिकेचे प्रवेशद्वार आकर्षक आणि प्रसन्न असावे, तिथली अडगळ दूर करून व्यवस्था दर्जेदार करावी, अशा सूचना प्रशासनाला दिल्या. ५ कोटी रुपये खर्चून मुलांसाठी सुसज्ज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचे नियोजन करा. नाट्यगृहाच्या कामासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन ते दर्जेदार बनवा. नमो उद्यान योजनेसाठी मिळालेला १ कोटीचा निधी अखर्चित राहू देऊ नका. शहरात नवीन जागा शोधून पर्यकांसाठी व स्थानिकांसाठी उत्तम उद्यान उभारा अशा सूचना आमदार राणे यांनी केल्या. नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी आमदार राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
----
पर्यायी मार्गाचा अभ्यास
कुंभारमाठ येथून थेट देवबागकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गांचा अभ्यास करा, जेणेकरून शहरातील कोंडी फुटेल. नळपाणी योजना आणि भुयारी गटार योजना वेळेत पूर्ण करा. तसेच, शहरातील भटक्या कुत्र्यांचा गंभीर प्रश्न तातडीने मार्गी लावा, असे नगराध्यक्षांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com