

33927
तंत्रज्ञानाची जोड; शिक्षणाची ओढ
सावंतवाडीतील शाळांना संगणक संच
सावंतवाडी, ता. २८ : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ६ (भटवाडी) आणि वि. स. खांडेकर विद्यालय या दोन शाळांना नगरसेविका दीपाली भालेकर यांच्या विशेष पाठपुराव्यातून संगणक उपलब्ध करून दिले. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते आज संगणकांचे अधिकृत वाटप करण्यात आले.
विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून हे संगणक या शाळांना प्रदान केले. सावंतवाडीतील शैक्षणिक सुविधांमध्ये वाढ व्हावी आणि विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे, यासाठी नगरसेविका दीपाली भालेकर आणि दिलीप भालेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, आज प्रत्यक्ष मान्यवरांच्या उपस्थितीत हे संगणक शाळांकडे सुपूर्द करण्यात आले.
शाळेच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लोकप्रतिनिधींनी राबविलेल्या या उपक्रमाचे याप्रसंगी पालकमंत्री राणे यांनी कौतुक केले. या मदतीमुळे जिल्हा परिषद शाळा क्रमांक ६ आणि खांडेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षणाची मोठी व्यवस्था उपलब्ध झाली असून, शिक्षक आणि पालकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले.