

rat२८p१९.jpg-
P26O33947
देवरूख ः जिल्हा परिषद भवनाच्या बाहेर लागलेल्या गाड्या.
मार्चअखेरची धावपळ; निधी खर्चाला वेग
जिल्हा परिषदेत कामे युद्धपातळीवर; कंत्राटदारांची गर्दी, सुटी दिवशीही कार्यालय सुरू
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. २८ ः रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये सध्या मार्चअखेरची लगीनघाई पाहायला मिळत आहे. आर्थिक वर्ष समाप्तीला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने निधी खर्च करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद परिसरात आलिशान वाहनांची वर्दळ लक्षणीयरित्या वाढली असून, विशेषतः बांधकाम, पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागांमध्ये कंत्राटदार व नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. कामाचा व्याप इतका वाढला आहे की, सुटीच्या दिवशीही कार्यालये सुरू ठेवावी लागली.
शासकीय आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असे असते. नियमानुसार विकासकामांवरील निधी खर्च करणे किंवा प्रलंबित कामांना प्रशासकीय मान्यता देणे ही प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य असते. वास्तविक पाहता, अधिकारी जानेवारी-फेब्रुवारीपासूनच नियोजनासाठी बैठका घेतात; परंतु यावर्षी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे प्रशासनासमोर मर्यादा आल्या होत्या. आता २०२५-२६ हे आर्थिक वर्ष संपत असताना शिल्लक राहिलेला निधी वेळेत खर्ची पाडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने आढावा बैठका घेऊन खातेप्रमुखांना मार्चअखेरपर्यंत जास्तीत जास्त निधी खर्च करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सध्या जिल्हा परिषदेत अनुदान वितरण प्रणालीद्वारे निधी वितरित करणे, बीडीएस प्रमाणपत्र मिळवणे, देयके (बिले) तयार करून ती कोषागार कार्यालयात मुदतीत सादर करणे आणि तालुकास्तरावर निधीचे वाटप करणे, अशी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
----
चौकट...
ठेकेदारांची धावपळ
या धावपळीत बांधकाम उत्तर व दक्षिण विभाग, पाणीपुरवठा, पाणी व स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण विभागांमध्ये सर्वाधिक लगबग दिसत आहे. आपली बिले वेळेत मंजूर करून घेण्यासाठी ठेकेदारांची मोठी धावपळ सुरू असून, अधिकारी आणि कर्मचारीदेखील रात्री उशिरापर्यंत थांबून कामे पूर्ण करत आहेत. मार्च अखेरीच्या दबावामुळे सर्वच विभागांतील उपस्थिती आणि कामाचा उरक वाढल्याचे चित्र सध्या रत्नागिरी जिल्हा परिषदेत पाहायला मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.