

34120
‘खारेपाटण’मुळे जिल्ह्याचा देशात लौकिक
तृप्ती धोडमिसे ः राष्ट्रीय कलाउत्सव स्पर्धेतील गुणवंतांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २९ : राष्ट्रीय कलाउत्सव स्पर्धा २०२५ मध्ये लोकसंगीत समूह वाद्य वादन या कला प्रकारामध्ये संगीत शिक्षक संदीप पेंडुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण या विद्यालयाचा देशामध्ये प्रथम क्रमांक आला. या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशा भावना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केल्या.
या अभूतपूर्व यशाबद्दल संगीत शिक्षक पेंडुरकर व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते विद्यार्थी आयुष मांगले, आर्या मोसमकर, सुमित ठोसर व वंश कानडे यांचा जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ही राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धा एनसीईआरटी दिल्ली व एससीईआरटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे (यशदा) येथे झाली. त्यामध्ये देशभरातील विविध कला सादर झाल्या.
श्रीमती धोडमिसे म्हणाल्या, ‘‘सिंधुदुर्ग जिल्हा हा कलाकारांची खाण आहे. अनेक बाल संगीतरत्ने या भूमीमध्ये आहेत. त्यांना शोधून त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचे काम, त्यांच्या कलेला पैलू पाडण्याचे महत्त्वपूर्ण व अवघड काम श्री. पेंडुरकर करत आहेत. त्यांचे खूप मोठे योगदान या यशामध्ये आहे.’’ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी हा सत्कार सोहळा झाला. व्यासपीठावर कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, प्रा. संजय सानप, विजय देसाई, महेश कोळसुलकर, रमाकांत राऊत, संतोष पाटणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.