

ओझरवाडी शाळेत आरोग्यावर मार्गदर्शन
चिपळूण ः लायन्स क्लब चिपळूण युनिटीच्या वतीने ओझरवाडी शाळेत किशोरवयीन मुलांचे आरोग्य, शरीरातील होणारे बदल तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम या विषयांवर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे आयोजन लायन्स क्लबच्या अध्यक्षा सौ. एकता मुळे तसेच माजी अध्यक्षा व क्लबच्या कॅबिनेट ऑफिसर सौ. तेजल पेढाबकर यांनी केले होते. या वेळी रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशन, रत्नागिरीच्या पर्यावरण जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा खटके पाटील, चिपळूण तालुका पर्यावरण अध्यक्षा सौ. अपूर्वा गायकवाड उपस्थित होते. यावेळी सौ. वर्षा खटके पाटील यांनी किशोरवयीन मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत, तसेच वाढत्या वयात शरीरात होणाऱ्या बदलांबाबत विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. सौ. अपूर्वा गायकवाड यांनी मोबाईलचा अतिवापर, त्याचे आरोग्यावर व अभ्यासावर होणाऱ्या परिणामावर माहिती दिली.
रामपूर-निर्व्हाळ रस्त्यावरील खड्डे बुजविणार
चिपळूण ः रामपूर गुढेफाटा ते निर्व्हाळपर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे दोन दिवसांत बुजवले जातील, अशी माहिती चिपळूण पंचायत समितीचे सदस्य गौरव पाटेकर दिली. चिपळूण-गुहागर रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. रामपूर तळ्याच्याजवळ, त्याचबरोबर रामपूर घाटीमध्ये, तांबी वाकण, तांबी पूल, निर्व्हाळ वाकण येथे मोठे खड्डे पडल्याने सतत अपघात होतात. हे खड्डे मृत्यूचा सापळा बनले आहेत. याबाबत २५ मार्चला चिपळूण पंचायत समितीची बैठक झाली. पंचायत समिती सदस्य गौरव पाटेकर यांची रामपूर निर्व्हाळपर्यंत खड्ड्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन याबाबत आवाज उठवला. २७ मार्चला गौरव पाटेकर बांधकाम विभागच्या अधिकाऱ्यांना परत भेटले व खड्ड्याची जाणीव करुन दिली. दोन दिवसांत खड्डे बुजवतो, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. काम न झाल्यास कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा पाटेकर यांनी दिला आहे.
‘नवोदय’ परीक्षेत सावर्डे विद्यालयाचे यश
चिपळूण ः जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सावर्डेतील निकम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत विद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांची पडवे येथील जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी निवड झाली आहे. या परीक्षेसाठी पाचवीतील ११ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी स्वराज कर्डिले, समर्थ सोनवणे, ओम सावर्डेकर, शार्दुल गोरे, अथर्व बंडगर, दर्शन कदम, श्रीपाद धुरी आणि वसुंधरा पाटील या आठ विद्यार्थ्यांनी यश मिळवून विद्यालयाचा गौरव वाढवला आहे. या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख साजिद चिकटे, प्रशांत सपकाळ, सुधीर कदम, अमित साळवी, मंगेश दाते, दीपक भुवड, सौ. सिद्धी सावंत, सौ. शिल्पा राजेशिर्के व सौ. श्रुती जाधव यांनी मार्गदर्शन केले.
पोफळी शाळेत सदिच्छा समारंभ
चिपळूण ः तालुक्यातील पोफळी प्राथमिक शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात झाला. मुख्याध्यापक महेंद्र कापडी यांनी प्रास्ताविकातून समारंभाचा हेतू स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळा व गुरुजन यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष वैभव पवार, सखी सावित्री समितीच्या उपाध्यक्षा सौ. रोहिणी गुळवे, प्रशांत कुडाळकर, परमेश्वर गुळवे यांनी पाल्यांवर केलेले संस्कार, त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास, दिलेले प्रोत्साहन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन याबाबत समाधान व्यक्त केले. या वेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. स्वप्नाली पाटील, शिक्षिका सौ. प्रतिभा धुमाळ, सौ. साधना गायकवाड आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.