

swt3014.jpg
34316
आडाळी : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने बनविण्यात आलेल्या स्मार्ट ग्रामपंचायत ॲपचे क्युअर कोडचे अनावरण करून लोकार्पण करताना प्रमोद कामत, अजिंक्य सावंत, पराग गांवकर, सतीश लळीत.
आडाळी ग्रामपंचायतीचे दिशादर्शक पाऊल
प्रमोद कामत : अॅपच्या लोकार्पणाचा सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कळणे, ता. ३० : आडाळी ग्रामपंचायतीने अॅपच्या माध्यमातून ग्रामस्थांना पारदर्शक सेवा देण्यासाठी उचललेले पाऊल हे राज्याला नवीन दिशा देणारे ठरेल, असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी व्यक्त केला.
आडाळी-फोंडीये ग्रुप ग्रामपंचायतीने एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘स्मार्ट ग्रामपंचायत अॅप’ विकसित केले आहे. त्याचे लोकार्पण रविवारी (ता. २९) कामत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य साक्षी तळवडेकर, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, सरपंच पराग गांवकर, निवृत्त प्रशासकीय अधिकारी सतीश लळीत, मोरगाव सरपंच संतोष आईर, सहाय्यक गटविकास अधिकारी गवस, विस्तार अधिकारी जाधव आदी उपस्थित होते. विविध दाखले, कर भरणा, ग्रामपंचायतीच्या विविध सेवांच्या संदर्भातील तक्रारी अशा सुविधा आता एका क्लिकवर आडाळी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिल्या आहेत.
कामत म्हणाले, ‘‘आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात स्वतःला कार्यक्षम बनविण्यासाठी ग्रामपंचायतीने असे अॅप बनवून स्वतःची जबाबदारी आणखी वाढविली आहे. अशा प्रकारचा उपक्रम जरी ग्रामस्थांच्या सोयीसाठी असला तरी सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी देखील वाढते. त्यामुळे आडाळी ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच असून राज्यासाठी आदर्श असे काम त्यांनी केले आहे. आम्ही जिल्ह्यासाठी हे अॅप स्वीकारण्याचा निश्चितच विचार करणार.’’
यावेळी सरपंच गांवकर व अॅपसाठी मेहनत घेणारे प्रवीण गांवकर यांच्या कौतुकासाठी त्यांनी पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन सत्कार केला. श्री. सावंत म्हणाले, ‘‘सतत नावीन्याचा आणि लोकाभिमुख विकासाचा ध्यास आडाळी ग्रामपंचायतीकडे दिसतो. अॅप हे त्याची फलनिष्पत्ती असून विकासाचे एक मॉडेल म्हणून गावाची ओळख निर्माण होत आहे. सतीश लळीत यांनीही अॅपच्या माध्यमातून घरबसल्या सेवा मिळतील, मी माझा घरपत्रक उतारा त्याद्वारे मिळविला, हे लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण आहे,’’ असे सांगितले.
क्यूआर कोडचे अनावरण करून कामत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आत्माराम गावकर यांच्या हस्ते कामत यांचा सत्कार करण्यात आला. अजिंक्य सावंत, साक्षी तळवडेकर यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संतोष गवस यांनी केले.
चौकट
दोन्ही बाजूने जबाबदारी वाढेल
सरपंच गावकर म्हणाले, ‘‘ग्रामस्थांना चांगल्या सुविधा देण्यासाठी हे अॅप आम्ही विकसित केले आहे. त्यामुळे अधिक गतिमान सेवा देण्याची जबाबदारी आमची वाढली आहे. त्याचवेळी कर भरणा करून प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी ग्रामस्थांवर बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे गावाच्या विकासाला गती मिळेल. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून काम करताना ही अभिनव संकल्पना सुचली. त्यामुळे याला अभियानाचे यश मानता येईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.