

भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर हाऊस
देवरूख नगरपंचायतीचा निर्णय; नागरिकांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ३१ ः देवरूख शहर गेल्या काही काळापासून वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा सामना करत आहे. या समस्येवर केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी देवरूख नगरपंचायतीने कंबर कसली आहे. शहरात लवकरच भटक्या कुत्र्यांसाठी एक हक्काचे ‘शेल्टर हाऊस’ उभारण्यात येणार असल्याची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच शहरात निर्बिजीकरण आणि लसीकरणामुळे कुत्र्यांची संख्या नियंत्रित राहण्यास मदत होणार आहे.
देवरूख शहरातील विविध प्रभागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. ही बाब गांभीर्याने घेत नगरपंचायतीने पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने विशेष मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत शहरातील ९८ भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया केली आहे तसेच रेबीजसारख्या जीवघेण्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी १२१ कुत्र्यांना प्रतिबंधात्मक लस टोचण्यात आहे, अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली. देवरूखमध्ये शेल्टर हाऊस उभारण्यात येत असून, ते सेवा केंद्र म्हणून विकसित केले जात आहे. यामध्ये आजारी किंवा जखमी कुत्र्यांसाठी औषधोपचाराची सोय असेल.
-------
कोट १
भटक्या कुत्र्यांचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत; म्हणूनच आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आधुनिक ‘शेल्टर हाऊस’ची संकल्पना मांडली आहे. ती लवकरच प्रत्यक्षात आणली जाणार आहे.
- मृणाल शेट्ये, नगराध्यक्षा, देवरूख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.